IND vs SA 2nd Test Live Match। केपटाउन: सध्या भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यात दुसऱ्या कसोटी सामन्याचा थरार रंगला आहे. सामन्याचा पहिला दिवस अविस्मरणीय राहिला. नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करताना यजमान आफ्रिकेचा संघ अवघ्या ५५ धावांत आटोपला. मोहम्मद सिराजने सर्वाधिक ६ बळी घेऊन भारताला मजबूत स्थितीत पोहचवले. आफ्रिकेला आपल्या पहिल्या डावात केवळ ५५ धावा करता आल्याने भारत मोठी आघाडी घेईल असे अपेक्षित होते. मात्र, भारतीय संघाला देखील काही खास कामगिरी करता आली नाही अन् टीम इंडिया १५३ धावांवर सर्वबाद झाली. विराट कोहलीने सर्वाधिक (४६), रोहित शर्माने (३९) आणि शुबमन गिलने (३६) धावा केल्या.
दरम्यान, दुसऱ्या सामन्यातील पहिल्या दिवशी दोन्हीही संघांना फलंदाजी आणि गोलंदाजीची संधी मिळाली. विशेष म्हणजे दोन्हीही संघ सर्वबाद देखील झाले. भारताचे तर सात फलंदाज खातेही न उघडता तंबूत परतले. तर, सहा फलंदाज सलग शून्यावर बाद होत गेले. १५३ धावांवर ४ बाद धावसंख्या होती तिच धावसंख्या सर्वबाद १५३ अशी राहिली. याचाच दाखला देत भारताचे माजी प्रशिक्षक रवी शास्त्री यांनी समालोचन करताना भन्नाट प्रतिक्रिया दिली, जी सोशल मीडियावर चांगलीच व्हायरल होत आहे.
भारताने शून्यावर सहा गडी गमावल्यानंतर रवी शास्त्रींनी समालोचन करताना म्हटले, "१५३ धावांवर चार गडी बाद अन् आता भारतीय संघ १५३ धावांवर सर्वबाद झाला. जर कोणी टॉयलेटला जाऊन परतले असेल, तर मी त्यांना सांगतो की, १५३ धावांवर भारत सर्वबाद झाला आहे. किंवा पाणी पिऊन कोणी आलं असेल तर त्यांनाही मी हे सांगत आहे." शास्त्रींची ही टिप्पणी सोशल मीडियावर चांगलीच व्हायरल होत आहे.
दुसऱ्या कसोटीसाठी भारतीय संघ - रोहित शर्मा (कर्णधार), यशस्वी जैस्वाल, शुबमन गिल, विराट कोहली, श्रेयस अय्यर, लोकेश राहुल (यष्टीरक्षक), रवींद्र जडेजा, जसप्रीत बुमराह, मोहम्मद सिराज, प्रसिद्ध कृष्णा आणि मुकेश कुमार.
दुसऱ्या कसोटीसाठी दक्षिण आफ्रिकेचा संघ -डीन एल्गर (कर्णधार), एडन मार्करम, टोनी डी झोर्झी, ट्रिस्टन स्टब्स, डेव्हिड बेडिंगहॅम, काइल वेरेन (यष्टीरक्षक), मार्को जान्सेन, केशव महाराज, कगिसो रबाडा, नांद्रे बर्गर आणि लुंगी एनगिडी.