India vs South Africa, 2nd Test Live Updates : शार्दूल ठाकूरच्या करिष्माई गोलंदाजीनंतर साऱ्या नजरा खिळल्या होत्या त्या अजिंक्य रहाणे व चेतेश्वर पुजारा या अनुभवी जोडीवर.. सातत्यानं अपयशी ठरणाऱ्या रहाणे-पुजारा यांच्यासाठी कारकीर्द वाचवण्यासाठी ही शेवटची संधी होती. पण, दडपणात खेळ कसा उंचवावा हे अनुभवातून शिकलेल्या या जोडीनं दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या तिसऱ्या कसोटीत कमाल केली. या दोघांनी वैयक्तिक अर्धशतकांसह शतकी भागीदारी करून भारताला मोठी आघाडी मिळवून दिली. तिसऱ्या दिवसाच्या पहिल्या सत्रात या दोघांनी वर्चस्व गाजवले असले तरी कागिसो रबाडानं तीन धक्के दिले. पण, तोपर्यंत भारतानं मोठी आघाडी मिळवली आहे.
भारताच्या पहिल्या डावातील २०२ धावांच्या प्रत्युत्तरात आफ्रिकेचा पहिला डाव २२९ धावांवर गडगडला. शार्दूल ठाकूर यानं मंगळवारी इतिहास घडवला. जोहान्सबर्ग कसोटी त्यानं एका डावात ७ विकेट्स घेण्याचा पराक्रम केला. आफ्रिकेत एका डावात ७ विकेट्स घेणारा तो पहिला आशियाई जलदगती गोलंदाज ठरला. १०० वर्षांच्या इतिहासात आफ्रिकेत दोनच जलदगती गोलंदाजांना डावात ७ विकेट्स घेता आल्या आहेत. शार्दूलनं ६१ धावांत ७ विकेट्स घेतल्या. भारताच्या दुसऱ्या डावात लोकेश ( ८ ) व मयांक ( २३ ) यांना अनुक्रमे मार्को जॅन्सेन व ऑलिव्हर यांनी बाद केले. २ बाद ४४ धावांवरून अजिंक्य व पुजारा यांनी डाव सावरण्यास सुरूवात केली आणि दिवसअखेर भारताला २ बाद ८५ धावांपर्यंत मजल मारली होती.
तिसऱ्या दिवसाच्या पहिल्या सत्रात पुजारा-रहाणे यांनी आक्रमक खेळ केला. डिसेंबर २०१९ पासून पुजारा व रहाणे यांनी मिळून २५.२३च्या सरासरीनं २२७१ धावा केल्या आहेत आणि १२ वेळी ही दोघं शून्यावर बाद झाली आहेत. २०२१मध्ये रहाणेनं १३ कसोटींत ४७९, तर पुजारानं १४ कसोटींत ७०२ धावा केल्या आहेत. मागील पाच कसोटींत पुजारानं १, ९१, ४, ६१, २६, २२, ०, ४७, ० व १६ अशी, तर अजिंक्यनं १७, ६९, ७१, ३५, ४, ४० व २० अशी कामगिरी केली होती. पण, आज पुजारानं ८६ चेंडूंत ५३ आणि रहाणेनं ७८ चेंडूंत ५८ धावांची खेळी केली. तिसऱ्या दिवसाच्या लंच ब्रेकपर्यंत भारतानं ६ बाद १८८ धावा करताना १६१ धावांची आघाडी घेतली आहे. रिषभ पंत चुकीचा फटका मारून शून्यावर बाद झाला.