India vs South Africa, 2nd Test Live Updates : भारतीय संघाला चांगल्या सुरुवातीनंतर धक्के बसण्यास सुरुवात झाली आहे. विराट कोहलीच्या अनुपस्थितीत लोकेश राहुलच्या नेतृत्वाखाली खेळणाऱ्या टीम इंडियानं सावध सुरुवात केली. मयांक अग्रवाल चांगल्या टचमध्ये दिसला, तर लोकेश दुसऱ्या बाजूनं विकेट टिकवून खेळत होता. पण, मयांकची विकेट गेली अन् मधल्या फळीतीत मजबूत भिंत पुन्हा ढासळली. चेतेश्वर पुजारा व अजिंक्य रहाणे यांना पुन्हा अपयश आले. दोघंही सलग दोन चेंडूंत माघारी परतले. कसोटीत अजिंक्य प्रथमच गोल्डन डकवर बाद झाला. लंच ब्रेकपर्यंत भारताच्या ३ विकेट्स ५३ धावावर पडल्या होत्या. ड्युआन ऑलिव्हरनं पुजारा व रहाणे यांची विकेट घेतली.
लोकेश राहुलच्या नेतृत्वाखाली जोहान्सबर्ग कसोटीत टीम इंडिया नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजीला मैदानावर उतरली. विराटनं पाठीच्या दुखण्यामुळे या सामन्यातून माघार घेतली, तर श्रेयस अय्यरही पोटदुखीमुळे या कसोटीसाठी निवडीसाठी उपलब्ध नव्हता. विराटच्या जागी हनुमा विहारीला संधी मिळाली. लोकेश राहुल व मयांक अग्रवाल यांनी सावध खेळ करताना संघाला आश्वासक सुरूवात करून दिली आहे. हनुमा विहारीनं भारत अ संघासोबत दक्षिण आफ्रिका दौऱ्यावर चांगली कामगिरी केली आहे आणि त्यामुळे त्याच्या समावेशानं टीम इंडियाला मधल्या फळीत मजबूती मिळाली आहे. विहारीनं भारत अ संघाच्या आफ्रिका दौऱ्यावर ६३, १३*, ५४, ७२* व २५ अशी कामगिरी केली आहे.
लोकेश व मयांक यांची ३६ धावांची भागीदारी मार्को जॅन्सेननं संपुष्टात आणली. मयांक २६ धावांवर बाद झाला. त्यानंतर पुजारा व लोकेश यांनी १३ धावांची भागीदारी केली. ऑलिव्हरनं २४व्या षटकातील तिसऱ्या चेंडूवर अप्रतिम बाऊन्सरवर पुजाराला ( ३) माघारी जाण्यास भाग पाडले. पुढच्याच चेंडूवर अजिंक्य ( ०) स्लीपमध्ये झेल देऊन माघारी परतला. मागील पाच कसोटींत पुजारानं १, ९१, ४, ६१, २६, २२, ०, ४७, ० व १६ अशी, तर अजिंक्यनं १७, ६९, ७१, ३५, ४, ४० व २० अशी कामगिरी केली आहे.