India vs South Africa, 2nd Test Live Updates : दक्षिण आफ्रिकेत कसोटी मालिका जिंकण्याचा इतिहास घडवण्याच्या तयारीत असलेल्या टीम इंडियाला एकामागून एक धक्के बसत आहेत. कर्णधार विराट कोहलीनं पाठीच्या दुखापतीमुळे जोहान्सबर्ग कसोटीतून माघार घेतली. विराटच्या जागी संघात हनुमा विहारी ( Hanuma Vihari) याला स्थान मिळाले. पण, पदार्पणाच्या सामन्यात दमदार कामगिरी करणाऱ्या श्रेयस अय्यरकडे ( Shreyas Iyer) पुन्हा दुर्लक्ष करण्यात आल्याचा सूर उमटत आहे. पण, श्रेयसला या कसोटीत न खेळवण्या मागचं कारण समोर आलं आहे. बीसीसीआयनं दिलेल्या माहितीनुसार श्रेयसच्या पोटात वेदना होत असल्यानं तो दुसऱ्या कसोटीत खेळण्यास उपलब्ध राहू शकला नाही. विराटची माघार अन् श्रेयसचा आजार यामुळे टीम इंडियाची चिंता वाढली आहे.
लोकेश राहुलच्या नेतृत्वाखाली जोहान्सबर्ग कसोटीत टीम इंडिया नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजीला मैदानावर उतरली. लोकेश राहुल व मयांक अग्रवाल यांनी सावध खेळ करताना संघाला आश्वासक सुरूवात करून दिली आहे. विराटच्या अनुपस्थितीत श्रेयस प्लेइंग इलेव्हनमध्ये जागा बनवण्यासाठी आघाडीवर होता. पण त्याची प्रकृती बिघडली. हनुमा विहारीनं भारत अ संघासोबत दक्षिण आफ्रिका दौऱ्यावर चांगली कामगिरी केली आहे आणि त्यामुळे त्याच्या समावेशानं टीम इंडियाला मधल्या फळीत मजबूती मिळाली आहे. विहारीनं भारत अ संघाच्या आफ्रिका दौऱ्यावर ६३, १३*, ५४, ७२* व २५ अशी कामगिरी केली आहे. त्यामुळे त्याची कसोटी मालिकेसाठी निवड करण्यात आली.
अजिंक्य रहाणे व चेतेश्वर पुजारा यांचा फॉर्म पाहता हनुमाचा समावेश संघासाठी फायद्याचा ठरणारा आहे.