India vs South Africa, 2nd Test Live Updates : भारत-दक्षिण आफ्रिका यांच्यातल्या दुसऱ्या कसोटीच्या चौथ्या दिवसाचा बराचसा खेळ पावसामुळे वाया गेला. साडेपाच तासानंतर चौथ्या दिवसाचा खेळ सुरू झाला अन् जसप्रीत बुमराहनं पहिल्याच चेंडूवर आफ्रिकेच्या फलंदाजाचा चकित केलं. त्यात आर अश्विनला दुसरेच षटक देऊन कर्णधार लोकेश राहुलनं वेगळी रणनीती खेळण्याचा प्रयत्न केला. पण, आफ्रिकेचा कर्णधार डीन एल्गर याच्या पक्क्या निर्धारासमोर सारे हरले. एल्गरनं सहकाऱ्यांना सोबत घेत आफ्रिकेला ऐतिहासिक विजय मिळवून दिला. आफ्रिकेनं ७ विकेट्स राखून हा सामना जिंकताना मालिकेत १-१ अशी बरोबरी मिळवली. जोहान्सबर्गवर अपराजित राहिलेला भारतीय संघ येथे प्रथमच हरला. विराट कोहलीच्या आक्रमकतेची उणीव या सामन्यात प्रकर्षानं जाणवली.
भारताच्या पहिल्या डावातील २०२ धावांच्या प्रत्युत्तरात आफ्रिकेचा पहिला डाव २२९ धावांवर गडगडला. शार्दूल ठाकूरनं ६१ धावांत ७ विकेट्स घेतल्या. भारताच्या दुसऱ्या डावात चेतेश्वर पुजारानं ८६ चेंडूंत ५३ आणि अजिंक्य रहाणेनं ७८ चेंडूंत ५८ धावांची खेळी केली. आर अश्विन व शार्दूल ठाकूर यांनी फलंदाजीत योगदान देताना अनुक्रमे १६ व २८ धावा केल्या. हनुमा विहारी एका बाजूनं विकेट टिकवून खेळला, परंतु भारताचा दुसरा डाव २६६ धावांवर आटोपला. हनुमा विहारी ४० धावांवर नाबाद राहिला.
भारतानं विजयासाठी ठेवलेल्या २४० धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना आफ्रिकेनं तिसऱ्या दिवसअखेर २ बाद ११८ धावा केल्या होत्या. डीन एल्गर व रॅसी व्हॅन डेर ड्युसेनं हे खेळपट्टीवर ठाण मांडून होते. प्रत्युत्तरात डीन एल्गर व एडन मार्कराम यांनी आफ्रिकेला चांगली सुरुवात करून दिली. पण, पुन्हा एकदा शार्दूल ठाकूरनं भागीदारी तोडली. त्यानं मार्करामला ( ३१) पायचीत पकडले. एल्गर व किगन पीटरसन यांनी टीम इंडियाची डोकेदुखी वाढवली होती. या जोडीनं दुसऱ्या विकेटसाठी ४६ धावा जोडल्या अन् आर अश्विननं आफ्रिकेला दुसरा धक्का दिला. पीटरसन ४४ चेंडूंत २८ धावा करून पायचीत झाला. पावसाच्या व्यत्ययामुळे चौथ्या दिवसाचा खेळ ७.१५ वाजता सुरू झाला.
एल्गर व व्हॅन डेर ड्युसेन ही जोडी भारतीय गोलंदाजांना जुमानत नव्हती. एल्गरनं कॅप्टन्सन इनिंग खेळताना अर्धशतक पूर्ण केले. व्हॅन डेर ड्युसेननंही मग आक्रमक फटकेबाजी करताना झटपट धावा जोडल्या. या जोडीनं तिसऱ्या विकेटसाठी १६० चेंडूंत ८६ धावा जोडल्या. मोहम्मद शमीनं ही भागीदारी तोडताना ड्युसेनला ( ४०) झेलबाद करून माघारी पाठवले. त्यानंतर आलेल्या टेम्बा बवुमाची शून्य धावांवर शार्दूल ठाकूरनं स्वतःच्याच गोलंदाजीवर रिटर्न कॅच सोडली. एल्गर व बवुमा या अनुभवी जोडीनं चौथ्या विकेटसाठी अर्धशतकी भागीदारी करताना चौथ्या दिवशी आफ्रिकेचा विजय पक्का केला. एल्गर ९६ धावांवर नाबाद राहिला.