India vs South Africa, 2nd Test Live Updates : दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या दुसऱ्या कसोटीत भारतीय संघाचा पहिला डाव २०२ धावांवरच गडगडला. कर्णधार लोकेश राहुल ( ५०) व आर अश्विन ( ४६) यांच्या खेळीच्या जोरावर भारतानं समाधानकारक पल्ला गाठला. प्रत्युत्तरात दक्षिण आफ्रिकेची सुरुवात खास झाली नसली तरी कर्णधार डीन एल्गर व किगन पीटरसन यांनी डाव सावरला. पण, दुसऱ्या दिवसाच्या पहिल्या सत्रात शार्दूल ठाकूर 'लॉर्ड'सारखा धावून आला. त्यानं ५ षटकांत ८ धावा देताना तीन विकेट्स घेत टीम इंडियाला सामन्यात कमबॅक करून दिले. त्यानं दोन निर्धाव षटकं टाकली.
मोहम्मद शमीनं चौथ्या षटकात आफ्रिकेचा सलामीवीर एडन मार्कराम ( ७) याला बाद केले. त्यानंतर कर्णधार डीन एल्गर व किगन पीटरसन यांनी सावध खेळ केला. रिषभ पंतनं आफ्रिकेच्या पीटरसननं १२ धावांवर असताना जीवदान दिले. जसप्रीत बुमराहच्या गोलंदाजीवर उडालेला झेल रिषभकडून सुटला. आफ्रिकेनं दिवसअखेर १ बाद ३५ धावा केल्या होत्या. त्यात दुसऱ्या दिवशीही ही जोडी फॉर्मात दिसत होती. त्यांची २११ चेंडूंतील ७४ धावांची भागीदारी शार्दूल ठाकूरनं संपुष्टात आणली. डीन एल्गर २८ धावांवर ( १२० चेंडू) बाद झाला. पीटरसननं पहिले अर्धशतक पूर्ण करताना संघाला शंभरी पल्ला पार करून दिला.
शार्दूलनं त्यानंतर पीटरसन ( ६२ ) व रॅसी व्हॅन डेर ड्युसन ( १) यांना माघारी पाठवलं. त्याच्या या धक्क्यांमुळे दक्षिण आफ्रिकेची अवस्था ४ बाद १०२ अशी झाली आहे.