India vs South Africa, 2nd Test Live Updates : दडपणात खेळ कसा उंचवावा हे अनुभवातून शिकलेल्या अजिंक्य रहाणे व चेतेश्वर पुजारा या जोडीनं दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या तिसऱ्या कसोटीत कमाल केली. या दोघांनी वैयक्तिक अर्धशतकांसह शतकी भागीदारी करून भारताला मोठी आघाडी मिळवून दिली. तिसऱ्या दिवसाच्या पहिल्या सत्रात या दोघांनी वर्चस्व गाजवले असले तरी कागिसो रबाडानं धक्के दिले. शार्दूल ठाकूरनं फलंदाजीतही कमाल दाखवताना भारताच्या आघाडीत अमुल्य योगदान दिले. हनुमा विहारीपण अखेरपर्यंत चिकटून राहिला.
भारताच्या पहिल्या डावातील २०२ धावांच्या प्रत्युत्तरात आफ्रिकेचा पहिला डाव २२९ धावांवर गडगडला. शार्दूल ठाकूर यानं मंगळवारी इतिहास घडवला. जोहान्सबर्ग कसोटी त्यानं एका डावात ७ विकेट्स घेण्याचा पराक्रम केला. आफ्रिकेत एका डावात ७ विकेट्स घेणारा तो पहिला आशियाई जलदगती गोलंदाज ठरला. १०० वर्षांच्या इतिहासात आफ्रिकेत दोनच जलदगती गोलंदाजांना डावात ७ विकेट्स घेता आल्या आहेत. शार्दूलनं ६१ धावांत ७ विकेट्स घेतल्या. भारताच्या दुसऱ्या डावात लोकेश ( ८ ) व मयांक ( २३ ) यांना अनुक्रमे मार्को जॅन्सेन व ऑलिव्हर यांनी बाद केले. २ बाद ४४ धावांवरून अजिंक्य व पुजारा यांनी डाव सावरण्यास सुरूवात केली आणि दिवसअखेर भारताला २ बाद ८५ धावांपर्यंत मजल मारली होती.
तिसऱ्या दिवसाच्या पहिल्या सत्रात पुजारा-रहाणे यांनी आक्रमक खेळ केला. पुजारानं ८६ चेंडूंत ५३ आणि रहाणेनं ७८ चेंडूंत ५८ धावांची खेळी केली. तिसऱ्या दिवसाच्या लंच ब्रेकपर्यंत भारतानं ६ बाद १८८ धावा करताना १६१ धावांची आघाडी घेतली आहे. रिषभ पंत चुकीचा फटका मारून शून्यावर बाद झाला. त्यानंतर आर अश्विन व शार्दूल ठाकूर यांनी फलंदाजीत योगदान देताना अनुक्रमे १६ व २८ धावा केल्या. शार्दूलचे फटके पाहून विराट कोहली ड्रेसिंगरुममध्ये टाळ्या वाजवताना दिसला. मोहम्मद शमी भोपळ्यावर माघारी परतला. जसप्रीत बुमराहनं आक्रमकता दाखवली, परंतु त्याला एका षटकारावरच समाधान मानावे लागले. भारताचा दुसरा डाव २६६ धावांवर आटोपला. हनुमा विहारी ४० धावांवर नाबाद राहिला. आफ्रिकेला विजयासाठी २४० धावा करायच्या आहेत.
Web Title: IND vs SA, 2nd Test Live Updates : South Africa need 240 runs to win, Lungi Ngidi (3/43), Kagiso Rabada (3/77) and Marco Jansen (3/64)
Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.