IND vs SA 2nd Test Match | केपटाउन: भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यातील दुसरा आणि अखेरचा कसोटी सामना केपटाउन येथे होणार आहे. सलामीच्या सामन्यात पाहुण्या भारतीय संघाला दारूण पराभवाचा सामना करावा लागला. एक डाव आणि ३२ धावांनी पराभव झाल्याने टीम इंडियाच्या खेळीवर प्रश्न उपस्थित केले जात आहेत. अशातच भारतीय संघाचे माजी कर्णधार सुनिल गावस्कर यांनी संघात दोन महत्त्वाचे बदल करण्याचा सल्ला दिला आहे. गावस्करांच्या म्हणण्यानुसार, दुसऱ्या कसोटी सामन्यातून आर अश्विन आणि प्रसिद्ध कृष्णा यांना विश्रांती द्यायला हवी.
प्रसिद्ध कृष्णा आणि आर अश्विनच्या जागी मुकेश कुमार आणि रवींद्र जडेजा यांना संधी मिळावी असे गावस्करांनी सांगितले. ते स्टार स्पोर्ट्सवर बोलत होते. दुसऱ्या कसोटी सामन्याबद्दल बोलताना गावस्करांनी म्हटले, "दुसऱ्या सामन्यासाठी भारताने संघात दोन बदल करायला हवेत असे मला वाटते. माझ्या माहितीनुसार रवींद्र जडेजा तंदुरूस्त असून त्याला संधी द्यायला हवी. अश्विनच्या जागी जड्डू आणि प्रसिद्ध कृष्णाच्या जागी मुकेश कुमारला आजमावून पाहावे. कारण सलामीच्या सामन्यात अश्विनला गोलंदाजीची पुरेशी संधी मिळाली नव्हती. तसेच प्रसिद्धच्या जागी मुकेश कुमार त्याच्या गतीचा वापर करून नवीन चेंडूने चांगली सुरूवात करू शकतो."
भारताची आफ्रिकेत 'कसोटी'भारतीय संघ सध्या दक्षिण आफ्रिका दौऱ्यावर असून तिथे कसोटी मालिका खेळवली जात आहे. ३२ वर्षांत एकदाही भारताला आफ्रिकेच्या धरतीवर विजय मिळवता आला नाही. सलामीच्या सामन्यात देखील याचाच प्रत्यय पाहायला मिळाला अन् भारताचा दारूण पराभव झाला. भारताला आफ्रिकेविरूद्धच्या पहिल्या सामन्यात एक डाव आणि ३२ धावांनी पराभव पत्करावा लागला. त्यामुळे दुसरा सामना जिंकून मालिका बरोबरीत ठेवण्याचे मोठे आव्हान भारतीय संघासमोर आहे.
कसोटी मालिकेसाठी भारतीय संघ -रोहित शर्मा (कर्णधार), शुबमन गिल, यशस्वी जैस्वाल, विराट कोहली, श्रेयस अय्यर, इशान किशन, अभिमन्यू ईश्वरन, लोकेश राहुल (यष्टीरक्षक), रविचंद्रन अश्विन, रवींद्र जडेजा, शार्दुल ठाकूर, मोहम्मद सिराज, मुकेश कुमार, आवेश खान, जसप्रीत बुमराह, प्रसिद्ध कृष्णा.