IND vs SA 2nd Test (Marathi News) : भारतीय संघाने दुसऱ्या कसोटीत जबरदस्त कामगिरी करताना दक्षिण आफ्रिकेवर विजय मिळवला. पहिल्या सामन्यातील पराभवानंतर भारताने या सामन्यात चांगला खेळ केला आणि मालिका १-१ अशी बरोबरीत सोडवली. मोहम्मद सिराज ( ६-१५) व जसप्रीत बुमराह ( ६-६१) यांनी अनुक्रमे पहिल्या व दुसऱ्या डावात उल्लेखनीय मारा करून विजयाचा पाया रचला. त्यानंतर ७९ धावांचे माफक लक्ष्य सहज पार करून टीम इंडियाने केप टाऊनमध्ये ऐतिहासिक कामगिरी केली. २०२४ची भारताने विजयाने सुरुवात केली. केप टाऊनमध्ये कसोटी जिंकणारा रोहित शर्मा पहिला आशियाई कर्णधार ठरला आहे.
दक्षिण आफ्रिकेचा पहिला डाव ५५ धावांवर गुंडाळल्यानंतर भारतीय संघाला मोठी आघाडी घेऊन डावाने कसोटी जिंकण्याची संधी होती. पण, रोहित शर्मा ( ३९), शुबमन गिल ( ३६) व विराट कोहली ( ४६) वगळल्यास अन्य फलंदाज अपयशी ठरले. भारताचा पहिला डाव ४ बाद १५३ वरून सर्वबाद १५३ असा गडगडला आणि ९८ धावांच्या आघाडीवर समाधान मानावे लागले. प्रत्युत्तरात, आफ्रिकेची गाडी दुसऱ्या डावातही घसरली. पण, एडन मार्करम उभा राहिला आणि त्याच्या १०३ चेंडूंत १७ चौकार व २ षटकारांनी १०६ धावांनी भारताला टेंशनमध्ये टाकले. मात्र, जसप्रीत बुमराहने ६१ धावा देत ६ विकेट्स घेऊन आफ्रिकेचा दुसरा डाव १७६ धावांवर गुंडाळला.
भारतीय जलदगती गोलंदाजांना कसोटी क्रिकेटमध्ये सर्व २० विकेट्स तिसऱ्यांदा घेता आल्या आहेत. यापूर्वी २०१८ मध्ये जोहान्सबर्ग कसोटीत ( वि. आफ्रिका) आणि २०२१ मध्ये नॉटिंगहॅम कसोटीत ( वि. इंग्लंड) भारताच्या जलदगती गोलंदाजांनी असा पराक्रम केला होता.
भारतासमोर विजयासाठी ७९ धावांचे आव्हान आहे. १८८२ मध्ये ऑस्ट्रेलियाने ८५ धावांचा यशस्वी बचाव केला होता आणि त्यांनी इंग्लंडला ७७ धावांत गुंडाळून ७ धावांनी सामना जिंकला होता. हा विक्रम मोडण्याची आज आफ्रिकेला संधी होती. पण, पहिल्या डावात शून्यावर बाद होण्याचा सर्व राग यशस्वी जैस्वालने दुसऱ्या डावात काढला. त्याने आफ्रिकेच्या गोलंदाजांना चांगला चोप दिला. त्याने २३ चेंडूंत २८ धावा करून रोहितसह ४४ धावा जोडल्या. नांद्रे बर्गरने ही विकेट मिळवली. कागिसो रबाडाने दुसरा धक्का देताना शुबमन गिलला ( १०) त्रिफळाचीत केले. विराट कोहली ( १२) विजयासाठी ४ धावांची गरज असताना मार्को यानसेनच्या गोलंदाजीवर बाद झाला. भारताने १२ षटकांत ३ बाद ८० धावा करून विजय मिळवला. रोहित १७ धावांवर नाबाद राहिला.