Virat Kohli Shubman Gill Dance Video: भारतीय संघाने पहिल्या कसोटी पराभव स्वीकारल्यानंतर दुसऱ्या कसोटीतील पहिला दिवस खूपच विचित्र राहिला. पहिल्या दिवशीच्या खेळात भारताने प्रथम दक्षिण आफ्रिकेला ५५ धावांत गुंडाळला. मोहम्मद सिराजने ६ बळी टिपले. त्यानंतर भारतीय संघाचा डावदेखील पहिल्याच दिवशी १५३ धावांत आटोपला. या डावात विराट कोहलीने सर्वाधिक ४६ धावा केल्या. त्यानंतर पहिल्या दिवसाचा खेळ संपेपर्यंत आफ्रिकेने पुन्हा दुसऱ्या डावात ६२ धावांत ३ बळी गमावले. दिवसभराच्या खेळात एक मजेशीर गोष्ट पाहायला मिळाली. विराट कोहली आणि शुबमन गिल यांच्यात मैदानावर मजेशीर डान्स पाहायला मिळाला.
विराट कोहली संघाचा सर्वात अनुभवी खेळाडू आहे. पण मौजमजा करण्यात तो युवा खेळाडूंपेक्षा एक पाऊल पुढे असतो. केपटाऊन कसोटीच्या पहिल्या दिवशी त्याने शुभमन गिलसोबत खूप मस्ती केली. विराट आणि गिल स्लिपमध्ये क्षेत्ररक्षण करत होते. खेळ संपण्यापूर्वी दोघांनी एकमेकांचा हात धरून फुगडी केल्यासारखा डान्स केला. यावेळी दोघांनाही हसू आवरत नव्हते. त्यांचा व्हिडीओही यावेळी कॅमेऱ्यात कैद झाला.
दरम्यान, प्रथम फलंदाजी करताना भारतीय संघाने नाणेफेक गमावली. पण गोलंदाजीत भारताने तुफानी कामगिरी केली. दक्षिण आफ्रिकेला भारतीय गोलंदाजांनी सळो की पळो करून सोडले. भारताकडून मोहम्मद सिराजने अप्रतिम गोलंदाजी करत १५ धावांत ६ बळी टिपले. तर बुमराह-मुकेश कुमारनेही २-२ बळी टिपले. भारतीय गोलंदाजांच्या दमदार कामगिरीनंतर फलंदाजांनी चांगली कामगिरी केली होती. एकेवेळी भारताची धावसंख्या ४ बाद १५३ होती. पण पुढील ११ चेंडूंमध्ये ६ बळी गमावल्याने भारताचा डाव १५३ धावांतच आटोपला. त्यानंतर भारतीय गोलंदाजांनी पुन्हा भेदक मारा केला. त्यानंतर आफ्रिकेने ६७ धावांत ४ बळी टिपले.