Join us  

११ चेंडूंत मॅच फिरली; भारताने एकही धाव न करता ६ विकेट्स गमावल्या, दक्षिण आफ्रिकेने इतिहास रचला

IND vs SA 2nd Test Live Updates Marathi : रोहित शर्मा व शुबमन गिल यांनी चांगली सुरुवात करून दिल्यानंतर विराट कोहलीने ( Virat Kohli) टीम इंडियाचा डाव सावरला होता.

By ऑनलाइन लोकमत | Published: January 03, 2024 7:31 PM

Open in App

IND vs SA 2nd Test Live Updates Marathi : रोहित शर्मा व शुबमन गिल यांनी चांगली सुरुवात करून दिल्यानंतर विराट कोहलीने ( Virat Kohli) टीम इंडियाचा डाव सावरला होता. पण, दक्षिण आफ्रिकेच्या लुंगी एनगिडीने ( Lungi Ngidi) एका षटकात ३ विकेट्स घेत सामन्याला कलाटणी दिली. त्यानंतर विराटही दडपणात विकेट देऊन माघारी परतला. मोहम्मद सिराज रन आऊट झाला. 

मोहम्मद सिराजने ( Mohammed Siraj ) दुसऱ्या कसोटीत ९-३-१५-६ अशी भन्नाट गोलंदाजी करून दक्षिण आफ्रिकेला शरणागती पत्करण्यास भाग पाडले. जसप्रीत बुमराह व मुकेश कुमार यांनी प्रत्येकी २ विकेट्स घेऊन आफ्रिकेचा पहिला डाव १२१ मिनिटांत ५५ धावांत गुंडाळला. भारताविरुद्ध कोणत्याही संघाची कसोटीतील ही सर्वात निचांक कामगिरी ठरली.  डेव्हिड बेडिंगहॅम ( १२) व कायले वेरेयने ( १५) वगळल्यास एकाही फलंदाजाला दुहेरी धावसंख्या करता आली नाही. आफ्रिकेचा पहिला डाव २३.२ षटकांत अवघ्या १२१ मिनिटांत ५५ धावांवर गडगडला. यापूर्वी २००८मध्ये भारताचा पहिला डाव २० षटकांत ११० मिनिटांत ७६ धावांवर गुंडाळला गेला होता आणि डेल स्टेनने २३ धावांत ५ विकेट्स घेतल्या होत्या.   

भारताच्या पहिल्या डावाची सुरुवात फारशी चांगली झाली नाही. सलामीवीर यशस्वी जैस्वाल भोपळ्यावर कागिसो रबाडाच्या गोलंदाजीवर माघारी परतला. पण, कर्णधार रोहित शर्मा चांगल्या सूरात दिसला. त्याने   ३८ धावांची खेळी करून पहिल्या १० षटकांत भारताला ५८ धावा उभारून दिल्या आणि आघाडी मिळवून दिली. रोहितने नंतर सावध खेळ करण्यास सुरुवात केली आणि त्यातच त्याची विकेट पडली. नांद्रे बर्गरने भारतीय कॅप्टनला ३९ ( ५० चेंडू) धावांवर झेलबाद केले. रोहित व शुबमन गिलने ५५ धावांची भागीदारी केली. शुबमन व विराट कोहलीने आक्रमकता कायम राखताना आफ्रिकेच्या गोलंदाजांना बॅकफूटवर ठेवले. गिलने कसोटीत १००० धावांचा टप्पा आज ओलांडला.

बर्गरने भारताला आणखी एक धक्का देताना गिलला ( ३६) बाद केले. श्रेयस अय्यरलाही त्याने भोपळ्यावर माघारी पाठवले. लोकेश राहुल व विराट मैदानावर उभे होते, परंतु धावांची गती मंद झाली होती. लोकेश ३३ चेंडूंत ८ धावांवर लुंगी एनगिडीच्या गोलंदाजीवर बाद झाला. एनगिडीने त्याच षटकात रवींद्र जडेजाला शून्यावर बाद केले. एनगिडी थांबण्याचं नाव घेत नव्हता आणि त्याने जसप्रीत बुमराहला शून्यावर बाद केले. आजच्या दिवसातील ही १७वी विकेट ठरली आणि केप टाऊनमध्ये एका दिवशी सर्वाधिक विकेट्स आज पडल्या. विराट ४६ धावांवर माघारी परतल्यानंतर आफ्रिकेने भारताचा डाव १५३ धावांवर गडगडला. भारताचे एकूण ६ फलंदाज भोपळ्यावर माघारी परतले. भारताला ९८ धावांची आघाडी घेता आली.

टॅग्स :भारत विरुद्ध दक्षिण आफ्रिकाविराट कोहली