IND vs SA 2nd Test (Marathi News) : भारत-दक्षिण आफ्रिका यांच्यातल्या दुसऱ्या कसोटीच्या पहिल्याच दिवशी २३ विकेट्स पडल्या आणि दुसऱ्या दिवशीही आफ्रिकेची अवस्था वाईट झाली आहे. जसप्रीत बुमराहने ( Jasprit Bumrah) त्याच्या पहिल्याच षटकात विकेट घेऊन यजमानांना बॅकफूटवर फेकले. त्यानंतर आणखी दोन धक्के त्याने दिले. मार्को यानसेनचा त्याने घेतलेला परतीचा झेल अफलातून होता.
आफ्रिकेचा पहिला डाव ५५ धावांवर गडगडला.. मोहम्मद सिराजने १५ धावांत ६ विकेट्स घेतल्या आमि त्याला जसप्रीत बुमराह व मुकेश कुमार यांनी प्रत्येकी दोन विकेट्स घेत उत्तम साथ दिली. भारताकडून रोहित शर्मा ( ३९), शुबमन गिल ( ३६) व विराट कोहली ( ४६) वगळता अन्य फलंदाजांनी निराश केले. भारताचे तळाचे ६ फलंदाज एकही धाव न करता माघारी परतले आणि पहिला डाव १५३ धावांवर गडगडला. नांद्रे बर्गर, लुंगी एनगिडी व कागिसो रबाडा यांनी प्रत्येकी ३ विकेट्स घेतल्या. पहिल्या दिवसाचा खेळ संपला तेव्हा आफ्रिकेच्या ३ बाद ६२ धावा झाल्या होत्या आणि आफ्रिका ३६ धावांनी पिछाडीवर होता.
दुसऱ्या दिवसाच्या पहिल्याच षटकात जसप्रीत बुमराहने आफ्रिकेला धक्का दिला आणि डेव्हिड बेडिंगहॅम ( ११) झेलबाद झाला. एडन मार्करम व कायले वेरेयने ही जोडी सावध खेळ करत होती, परंतु वेरेयनेचा ( ९) फटका चूकला अन् जसप्रीतच्या गोलंदाजीवर मोहम्मद सिराजच्या हाती सोपा झेल देऊन तो माघारी परतला. मार्को यानसेन धावांची गती वाढवण्याच्या प्रयत्नात दिसला, परंतु बुमराहने त्यालाही बाद केले. बुमराहने स्वतःच्याच गोलंदाजीवर अप्रतिम परतीचा झेल घेऊन यानसेनला ( ११) माघारी जाण्यास भाग पाडले. आफ्रिकेला १०३ धावांवर सहावा धक्का बसला. बुमराहने केशव महाराजची विकेट घेत डावातील पाचवी विकेट घेतली आणि आफ्रिकेचे ७ फलंदाज १११ धावांवर माघारी पाठवले.