IND vs SA, 2nd Test : भारतीय संघाला जोहान्सबर्ग कसोटीत पराभव पत्करावा लागला असला तरी काही खेळाडूंनी त्यांच्या कामगिरीनं प्रभावित केलं. लोकेश राहुल, आर अश्विन, चेतेश्वर पुजारा, अजिंक्य रहाणे, हनुमा विहारी यांनी फलंदाजीत संघर्षपूर्ण कामगिरी बजावली. शार्दूल ठाकूरने तर कसोटी गाजवली. त्यानं दक्षिण आफ्रिकेच्या पहिल्या डावात ६१ धावांत ७ विकेट्स घेताना इतिहास घडवला. पण, या सामन्याच्या दुसऱ्या डावात त्याचा करिष्मा चालला नाही आणि त्यामुळे संतापलेल्या शार्दूलनं दक्षिण आफ्रिकेचा फलंदाज टेम्बा बवुमा याला शिवी दिली. शार्दूलनं दिलेल्या शिवीचा आवाज स्टम्प्समधील माईकमध्ये कॅप्चर झाला आणि तो व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.
या सामन्यात भारताचा गोलंदाज जसप्रीत बुमराह व आफ्रिकेच्या मार्को जॅन्सेन यांच्यातही शाब्दील बाचाबाची झाली होती. चौथ्या दिवसाच्या अखेरच्या सत्रात शार्दूलनं ही शिवी दिली. यजामन आफ्रिकेला विजयासाठी ९ धावांची गरज होती आणि शार्दूल ६७वं षटक टाकण्यासाठी आला. त्या षटकातील दुसरा चेंडू टाकण्यासाठी शार्दूल रन अप घेऊन जेव्हा नॉन स्ट्रायकर एंडच्या स्टम्पजवळ आला तेव्हा स्ट्राईकवर असलेल्या बवुमानं माघार घेतली. त्यानंतर चिडलेल्या शार्दूलनं शिवी दिली. याच सामन्यात लोकेश राहुलनं फलंदाजी करताना कागिसो रबाडासोबत असेच केले होते, तेव्हा अम्पायरनी त्याला ताकिद दिली होती.
पाहा व्हिडीओ...
जोहान्सबर्गवर भारताचा हा पहिलाच कसोटी पराभव ठरला. यापूर्वी झालेल्या पाच सामन्यांत भारतानं दोन विजय मिळवले होते, तर तीन सामने ड्रॉ केले होते. राहुल द्रविड व विराट कोहली यांच्या नेतृत्वाखाली हे दोन्ही विजय आले होते. आफ्रिकेचा कर्णधार डीन एल्गर १८८ चेंडूंचा सामना करताना १० चौकारांच्या मदतीनं ९६ धावांवर नाबाद राहिला. एडन मार्कराम ( ३१), रॅसी व्हॅन डेर ड्युसेन ( ४०), किगन पीटरसन ( २८) आणि टेम्बा बवुमा ( २३*) यांनी योगदान दिलं.