India vs South Africa, 3rd day 3 Test Live Updates : Cheteshwar Pujara - Ajinkya Rahane failed again - दक्षिण आफ्रिका दौऱ्यातील कसोटी मालिकेत भारतीय संघाची निवड करताना चेतेश्वर पुजारा आणि अजिंक्य रहाणे यांना संधी द्यावी का?, हा प्रश्न चर्चिला गेला. कारण, त्यांचा फॉर्म... त्यांची जागा घेण्यासाठी हनुमा विहारी, श्रेयस अय्यर, शुबमन गिल हे खेळाडू रांगेत होते. अय्यरनं तर न्यूझीलंडविरुद्धच्या पदार्पणाच्या कसोटीत शतकी खेळी करून त्याची दावेदारी मजबूत केली. त्यामुळेच अय्यरला आफ्रिका दौऱ्यावर निवड समिती घेऊन गेली. पण, हा दौरा पुजारा व रहाणे यांच्या कारकीर्दिची दिशा ठरवणारा असेल, हेही त्याचवेळी निश्चित झाले होते. त्यामुळे या दोघांवर प्रचंड दडपण होते आणि अजूनही आहे.. जोहान्सबर्ग कसोटीच्या दुसऱ्या डावातील या दोघांची वैयक्तिक अर्धशतकं वगळली, तर त्यांनी या मालिकेत फार काही करून दाखवलं नाही. आज तर ही दोघं पुन्हा अपयशी ठरली आणि कदाचित त्यांची कसोटी कारकीर्दितील हा शेवटचा डाव असल्याची चर्चा सुरू झाली.
चेतेश्वर पुजारा व अजिंक्य रहाणे यांना घरच्या मैदानापाठोपाठ परदेशातही चांगली कामगिरी करता आलेली नाही. दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या या मालिकेत पुजारानं ६ डावांत १२४ धावा केल्या आहेत, तर रहाणेला ६ डावांत १३६ धावा करता आल्या आहेत. या मालिकेत पुजारानं तीन सामन्यांत ६, १६, ३, ५३, ४३, ९ अशा, तर रहाणेनं ४८, २०, ०, ५८, ९ व १ अशा धावा केल्या आहेत. रहाणेनं २०२० मध्ये अखेरचं शतक झळकावलं होते, तर पुजारानं २०१९ मध्ये ऑस्ट्रेलियविरुद्धच १९३ धावांची खेळी केली होती.
पुजाराची मागील १२ महिन्यांतील कामगिरी पाहिल्यास त्यानं १५ सामन्यांत २५.२९च्या सरासरीनं ६८३ धावा केल्या आहेत आणि त्यात पाच अर्धशतकांचा समावेश आहे. रहाणेनं १४ सामन्यांत २०.८४च्या सरासरीनं ५२१ धावा केल्या आहेत. या दोघांव्यतिरिक्त मयांक अग्रवाल यालाही काही खास करता आलेले नाही. दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या मालिकेत त्यानं ६ डावांमध्ये २२.५०च्या सरासरीनं १३५ धावा केल्या आहेत.