India vs South Africa, 3rd day 3 Test Live Updates : चेतेश्वर पुजारा आणि अजिंक्य रहाणे यांना आणखी किती संधी देणार, हा प्रश्न आता खऱ्या अर्थानं विचारण्याची वेळ आली आहे. जोहान्सबर्ग कसोटीच्या दुसऱ्या डावात या दोघांनी अर्धशतकी खेळी करून टीम इंडियाचा डाव सावरला. त्यानंतर ही जोडी फॉर्मात परतली असे वाटत होते, परंतु तिसऱ्या कसोटीत त्यांनी पुन्हा निराश केलं. दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या तिसऱ्या कसोटीच्या तिसऱ्या दिवसाच्या पहिल्या दोन षटकांत हे दोघेही माघारी परतले आणि भारतीय संघ अडचणीत सापडला.
भारताच्या पहिल्या डावातील २२३ धावांच्या प्रत्युत्तरात आफ्रिकेचा पहिला डाव २१० धावांवर गडगडला. भारताला आता दुसऱ्या डावात चांगली कामगिरी करून दाखवण्याची संधी होती. पण, लोकेश राहुल ( १०) व मयांक अग्रवाल ( ७) हे सलामीवीर याही डावात अपयशी ठरले. भारतानं दुसऱ्या दिवसअखेर २ बाद ५७ धावा करताना ७० धावांची आघाडी घेतली होती. विराट कोहली ३९ चेंडूंत १४ व चेतेश्वर पुजारा ३१ चेंडूंत ९ धावांवर खेळत होता. पण, तिसऱ्या दिवसाच्या दुसऱ्याच चेंडूंवर पुजारा बाद झाला. किगन पीटरसननं अप्रतिम झेल टिपून त्याला माघारी जाण्यास भाग पाडले.
अजिंक्य रहाणे कागिसो रबाडाच्या उत्तम बाऊन्सरवर बाद झाला. यष्टिरक्षकाच्या हातून चेंडू निसटला होता, परंतु कर्णधार डीन एल्गरनं तो टिपला अन् रहाणे १ धावावर बाद झाला. पुजारा व रहाणे यांनी पहिल्या डावात अनुक्रमे ४३ व ९ धावा केल्या होत्या.