India vs South Africa, 3rd day 3 Test Live Updates : भारत-दक्षिण आफ्रिका यांच्यातल्या तिसऱ्या कसोटीचा तिसरा दिवस हा दोन्ही संघांसाठी चढ-उतारांचा राहिला. पहिल्या सत्रातील पहिल्या ११ चेंडूंवर भारताचे दोन अनुभवी फलंदाज माघारी पाठवून आफ्रिकेनं सामना मुठीत घेतला. पण, नंतर रिषभ पंत व विराट कोहली ( Rishabh Pant - Virat Kohli) यांनी ती पकड सैल करताना भारताला फ्रँटसीटवर आणून बसवले. इथेच रोमांच थांबला नाही. लुंगी एनगिडीनं विराटची विकेट घेतली अन् भारताचा डाव पुन्हा गडगडला... रिषभ पंत अखेरपर्यंत खेळपट्टीवर उभा राहिला. त्यानं १३९ चेंडूंत ६ चौकार व ४ षटकारांसह नाबाद १०० धावा केल्या. संघाच्या १५२ धावा असताना विराट बाद झाला अन् अवघ्या ४६ धावांत सहा फलंदाज माघारी फिरले. रिषभच्या शतकामुळे टीम इंडियाला आफ्रिकेसमोर आव्हानात्मक लक्ष्य उभं करता आलं.
लोकेश राहुल ( १०), मयांक अग्रवाल ( ७), चेतेश्वर पुजारा ( ९) आणि अजिंक्य रहाणे ( १) हे माघारी परतल्यानं भारताची अवस्था ४ बाद ५८ अशी झाली होती. पण, रिषभ व विराटनं टीम इंडियाचा डाव सावरला. रिषभ मागून येऊन अर्धशतक पूर्ण केले आणि विराटनं दुसऱ्या बाजूनं संयमी खेळ करून त्याला साथ दिली. पण, लंच ब्रेकनंतर भारताला पाचवा धक्का बसला. १४३ चेंडूंत २९ धावा करणारा विराट कोहली परतला माघारी परतला अन् रिषभ पंतसोबतची ९४ धावांची भागीदारी संपुष्टात आली.विराट माघारी परतला अन् भारताची गाडी घसरताना दिसली.
आक्रमक मोडमध्ये असलेल्या रिषभला मग बचावात्मक खेळ करावा लागला. एका बाजूनं तो डाव सावरून होता, परंतु समोर विकेट पडल्या. आर अश्विन ( ७), शार्दूल ठाकूर (५) व उमेश यादव (०) हे झटपट माघारी परतले. ८८ धावांवर असताना रिषभला जीवदान मिळालं, महाराजनं झेल सोडला. मोहम्मद शमी बाद झाल्यानंतर रिषभ आक्रमक फटकेबाजी करू लागला. ९४ धावांवर त्याला टेम्बा बवुमाकडून जीवदान मिळाले अन् त्यानं सोडलेला चेंडू चौकार गेला. रिषभनं १३१ चेंडूंत शतक पूर्ण केलं. जसप्रीत बुमराह ( २) बाद झाला अन् भारताचा दुसरा डावही आटोपला. भारतानं दुसऱ्या डावात १९८ धावा करताना आफ्रिकेसमोर विजयासाठी २१२ धावांचे लक्ष्य ठेवले आहे. मार्को येनसन ( ४-३८), कागिसो रबाडा ( ३-५३) आणि लुंगी एनगिडी ( ३-२१) यांनी सुरेख कामगिरी केली.