India vs South Africa, 3rd day 3 Test Live Updates : रिषभ पंतच्या ऐतिहासिक शतकानं टीम इंडियाची लाज वाचवली खरी, परंतु दक्षिण आफ्रिकेकडून तितकेच तोडीसतोड प्रत्युत्तर मिळाले. डीन एल्गर व किगन पीटरसन यांनी दुसऱ्या विकेटसाटी केलेल्या दमदार भागीदारीनं भारतीय खेळाडूंना तणावात ठेवले. अखेरच्या षटकात जसप्रीत बुमराहनं ही जोडी तोडली, परंतु अजूनही आर-पारची लढाई संपलेली नाही. विराट कोहली ( Virat Kohli) त्याच्या नेहमीच्या आक्रमक पवित्र्यात दिसल्यानं भारतीय चाहते आनंदात असले तरी क्रिकेट चाहत्यांना त्याचं हे वागणं न पटणारे आहे. तिसऱ्या दिवसअखेर आफ्रिका फ्रंटसीवटवर दिसत असली तरी उद्या काय होईल याचा अंदाज आत्ताच बांधणे अवघड आहे.
रिषभ पंतनं तिसऱ्या कसोटीचा तिसरा दिवस गाजवला. ४ बाद ५८ अशा अवस्थेत असलेल्या टीम इंडियाला रिषभ पंत व विराट कोहली या जोडीनं सावरलं. पण, विराट माघारी परतल्यानंतर रिषभनं परिपक्व खेळ करताना समाधानकारक पल्ला गाठून दिला. त्यानं १३९ चेंडूंत ६ चौकार व ४ षटकारांसह नाबाद १०० धावा केल्या. दक्षिण आफ्रिकेत शतक झळकावणारा तो पहिला आशिआई यष्टिरक्षक-फलंदाज ठरला. त्यानं महेंद्रसिंग धोनीचा २०१०साली नोंदवलेलाही विक्रम मोडला. रिषभच्या या अविश्वसनीय खेळीनंतर भारतीय गोलंदाजांकडून उल्लेखनीय कामगिरीची अपेक्षा होती, पण आफ्रिकेचा कर्णधार डीन एल्गर व किगन पीटरसन चांगले खेळले.
भारतानं दुसऱ्या डावात १९८ धावा करताना आफ्रिकेसमोर विजयासाठी २१२ धावांचे लक्ष्य ठेवले. मार्को येनसन ( ४-३८), कागिसो रबाडा ( ३-५३) आणि लुंगी एनगिडी ( ३-२१) यांनी सुरेख कामगिरी केली. प्रत्युत्तरात मैदानावर उतरलेल्या आफ्रिकेला मोहम्मद शमीनं झटका दिला. एडन मार्कराम ( १६) याला शमीनं पुन्हा एकदा बाद करून आफ्रिकेला २३ धावांवर पहिला धक्का दिला. पण, त्यानंतर एल्गर व पीटरसन यांनी भारतीय गोलंदाजाचा धैर्यानं सामना केला. समोरून भारतीय गोलंदाज आग ओकत असताना यष्टिंमागून रिषभ पंत व विराट कोहली आफ्रिकन गोलंदाजांच एकाग्रता भंग करण्यासाठी सारे प्रयत्न करताना दिसले. दोघंही सुसाट स्लेजिंग करत होते. एल्गरला २२ धावांवर असताना आर अश्विननं LBW केले, परंतु त्यानं DRS घेतला. त्यात चेंडू यष्टिंवरून जात असल्याचे रिप्लेत दिसताच विराटचा पारा चढला... एल्गरला जीवदान मिळाले.
पण, त्यानंतर पुढे जसप्रीत बुमराहच्या गोलंदाजीवर याच DRS मध्ये एल्गर झेलबाद झाल्याचे स्पष्ट झाले अन् भारताला अखेर त्याची विकेट मिळवण्यात यश आले. दिवसअखेर आफ्रिकेनं २ बाद १०१ धावा केल्या आहेत. त्यांना विजयासाठी आणखी १११ धावा करायच्या असून हातात ८ विकेट्स आहेत. एल्गर ९६ चेंडूंत ३० धावा करून झेलबाद झाला. पीटरसन ६१ चेंडूंत ७ चौकारांसह ४८ धावांवर नाबाद आहे.
Web Title: IND vs SA, 3rd day 3 Test Live Updates : Stumps on Day 3 - South Africa need 111 runs and India need 8 wickets
Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.