IND vs SA 3rd ODI Live Updates: भारतीय संघाचा कर्णधार केएल राहुल याने दक्षिण आफ्रिकेविरूद्धच्या तिसऱ्या आणि अखेरच्या वन डे सामन्यात टॉस जिंकून प्रथम गोलंदाजीचा निर्णय घेतला. भारताने पहिले दोन सामना गमावल्यामुळे संघात बदल केले जातील अशी अपेक्षा सर्वच क्रिकेटरसिकांना होती. त्यानुसार, शेवटच्या सामन्यासाठी भारतीय संघात चार मोठे बदल करण्यात आले. सूर्यकुमार यादव, जयंत यादव, प्रसिद्ध कृष्णा आणि दीपक चहर यांना संघात स्थान देण्यात आले आहे. तर रविचंद्रन अश्विन, शार्दुल ठाकूर, भुवनेश्वर कुमार आणि व्यंकटेश अय्यर यांना संघातून वगळण्यात आलं. ऋतुराज गायकवाडला मात्र या मालिकेत एकाही सामन्यासाठी संधी देण्यात न आल्याने सोशल मिडियावर काहीशी नाराजी दिसून आली.
तीन सामन्यांच्या मालिकेत यजमान दक्षिण आफ्रिकेने पहिले दोन्ही वन डे सामने जिंकून अजिंक्य आघाडी घेतली आहे. भारताचा हा आफ्रिका दौऱ्यावरील शेवटचा सामना आहे. पहिला कसोटी सामना वगळता भारताला एकाही सामन्यात विजय मिळवता आलेला नाही. त्यामुळे आजचा सामना जिंकून दौऱ्याचा शेवट गोड व्हावा, अशी भारतीय संघाला आणि फॅन्सची आशा आहे.
भारताने या दौऱ्याची सुरूवात दमदार विजयाने केली. पण त्यानंतर भारताला पराभवांचाच सामना करावा लागला. आफ्रिकन संघाने कसोटी मालिका पिछाडीवर असताना २-१ने जिंकली. त्यानंतर वन डे मालिकेत भारतीय खेळाडू दमदार खेळ दाखवतील अशी आशा होती. पण साऱ्यांचीच निराशा झाली. दोन्ही सामने आफ्रिकेने सहज जिंकले. त्यामुळे तिसऱ्या सामन्यासाठी संघात बदल करणं क्रमप्राप्त होतं. आता हा सामना जिंकून भारतीय संघ लाज राखणार का, याकडे साऱ्यांचे लक्ष आहे.