IND vs SA 3rd ODI | पर्ल : आज भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यात तीन सामन्यांच्या वन डे मालिकेतील अखेरचा सामना खेळवला जात आहे. विजयी सलामी देऊन भारतीय संघाने आघाडी घेतली होती, मात्र दुसरा सामना जिंकून यजमानांनी बरोबरी साधली. त्यामुळे आजचा सामना निर्णायक आहे. आज विजय मिळवून मालिका खिशात घालण्याचे आव्हान दोन्हीही संघासमोर असेल. आजच्या सामन्यातून रजत पाटीदार भारतीय संघात पदार्पण करत आहे. आजच्या सामन्यासाठी नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय यजमान दक्षिण आफ्रिकेने घेतला आहे. सलामीवीर ऋतुराज गायकवाडला दुखापतीमुळे विश्रांती देण्यात आली असून कुलदीप यादवच्या जागी वॉशिंग्टन सुंदरला संधी मिळाली आहे.
आजच्या सामन्यासाठी भारतीय संघ -लोकेश राहुल (कर्णधार), रजत पाटीदार (पदार्पण), साई सुदर्शन, संजू सॅमसन, तिलक वर्मा, रिंकू सिंग, वॉशिंग्टन सुंदर, अक्षर पटेल, अर्शदीप सिंग, आवेश खान, मुकेश कुमार.
दक्षिण आफ्रिकेचा संघ - एडन मार्करम (कर्णधार), रीझा हेंड्रिक्स, टोनी डी जॉर्जी, रॅसी व्हॅन डर डुसेन, हेनरिक क्लासेन (यष्टीरक्षक), डेव्हिड मिलर, विआन मुल्डर, केशव महाराज, नांद्रे बर्गर, लिझाद विल्यम्स, ब्यूरन हेंड्रिक्स.
पहिल्या दोन्ही सामन्यांत सलामी जोडीच्या अपयशानंतर भारतीय संघाला आज यजमान दक्षिण आफ्रिकेविरुद्ध तिसऱ्या आणि अखेरच्या वन डे सामन्यात आघाडीच्या सर्वच फलंदाजांकडून दमदार कामगिरीची अपेक्षा असेल. भारताने पहिला सामना सहज जिंकल्यानंतर यजमान संघाने मंगळवारी दुसऱ्या सामन्यात भारताचा आठ गडी राखून सहज पराभव करीत मालिकेत १-१ अशी बरोबरी साधली. निर्णायक सामना जिंकून मालिका खिशात घालण्याची संधी असल्याने ऋतुराज गायकवाड आणि साई सुदर्शन या सलामीवीरांना धडाकेबाज सुरुवात करावी लागेल. साई सुदर्शनने दोन्ही सामन्यांत ५५ आणि ६२ धावांचे योगदान दिले. गायकवाड मात्र ५ आणि ४ धावा काढून परतला होता. सलामी जोडीने पहिल्या सामन्यात २३ आणि दुसऱ्या सामन्यात चार धावांची भागीदारी केली. याउलट, यजमान संघाकडून सलामीवीर टोनी झोर्जी याने पहिले शतक ठोकले तर रीझा हेंड्रिक्सने ५२ धावांची खेळी केली.
गोलंदाजीत अर्शदीप आणि आवेश खान हे पहिल्या दोन्ही सामन्यांत सरस ठरले होते. त्यांच्यासोबत अनुभवी लेगस्पिनतर युझवेंद्र चहल याला संधी मिळू शकते. अशावेळी कुलदीप यादव किंवा अक्षर पटेल यापैकी एकाला बाहेर बसावे लागेल. दक्षिण आफ्रिका संघात झार्जीच्या कामगिरीमुळे उत्साह आहे. क्विंटन डिकॉक याचा पर्याय गवसल्याची संघाची भूमिका असून, वेगवान गोलंदाज नांद्रे बर्गर यानेदेखील लक्षवेधी कामगिरी केली आहे.