Henrich Klaasen vs Team India, IND vs SA 3rd T20: भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यात ४ सामन्यांची T20 मालिका खेळवली जात आहे. पहिल्या दोन सामन्यांनंतर दोन्ही संघांमधील मालिका १-१ अशी बरोबरीत आहे. तिसरा सामना आज (१३ नोव्हेंबर) सेंच्युरियनमध्ये होणार आहे. हे मैदान भारतीय संघासाठी अद्याप फलदायी ठरलेले नाही. अशा स्थितीत हा नकोसा विक्रम भारतीय संघासाठी धोक्याची घंटा मानली जाऊ शकते. या मैदानावर सूर्यकुमार यादवच्या भारतीय संघाला दक्षिण आफ्रिकेचा फलंदाज हेनरिक क्लासेन पासूनही दूर राहावे लागणार आहे. त्यामागेही आकडेवारीचे कारण आहे.
सेंच्युरियनमध्ये भारताने एकही T20 सामना जिंकलेला नाही
सेंच्युरियनच्या या सुपरस्पोर्ट पार्क स्टेडियममध्ये भारतीय संघ आतापर्यंत फक्त एकच T20 सामना खेळला आहे. २१ फेब्रुवारी २०१८ रोजी झालेल्या या सामन्यात दक्षिण आफ्रिकेने भारताचा ६ गडी राखून पराभव केला. त्या सामन्यात हेनरिक क्लासेन हा विजयाचा नायक ठरला होता आणि त्यालाच सामनावीर म्हणून निवडण्यात आले होते.
क्लासेनने केली होती तुफानी खेळी
त्या सामन्यात विराट कोहलीच्या नेतृत्वाखाली भारतीय संघाने ४ गड्यांच्या मोबदल्यात १८८ धावा केल्या होत्या. मनीष पांडेने ४८ चेंडूत ७९ धावांची खेळी केली होती. तर महेंद्रसिंग धोनीने २८ चेंडूत ५२ धावा केल्या होत्या. प्रत्युत्तरात आफ्रिकन संघाने अवघ्या १८.४ षटकांत ४ गडी गमावून सामना जिंकला होता. आफ्रिकेकडून यष्टीरक्षक फलंदाज क्लासेनने ३० चेंडूत ६९ धावा केल्या होत्या. तसेच कर्णधार जेपी ड्युमिनीने ६४ धावांची खेळी होती. त्या मालिकेतील केवळ क्लासेन, डेव्हिड मिलर आणि रीझा हेंड्रिक्स हे ३ खेळाडू सध्याच्या मालिकेत खेळत आहेत. अशा स्थितीत भारतीय संघाला या मैदानावर क्लासेनपासून सावध राहावे लागणार आहे.
भारत-आफ्रिका T20 मधील आमने-सामने रेकॉर्ड
- एकूण - २९
- भारत- १६
- आफ्रिका- १२
- अनिर्णित- १