India vs South Africa 3rd T20I Live Updates : मागील दोन सामन्यांत फार कमाल करू न शकलेल्या ऋतुराज गायकवाडला ( Ruturaj Gaikwad) मोक्याच्या सामन्यात सूर गवसला. ऋतुराजने पहिली फिफ्टी झळकावली. इशान किशनने ( Ishan Kishan) यानेही फॉर्म कायम राखताना आणखी एक अर्धशतक झळकावले. पहिल्या १० षटकांत १ बाद ९७ धावा करून ऋतुराज व इशानने विक्रमी कामगिरी केली. पण, त्यानंतर डावाच्या दुसऱ्या टप्प्यात दक्षिण आफ्रिकेच्या गोलंदाजांनी चांगले पुनरागमन केले. आफ्रिकेच्या खेळाडूंकडून सोपे झेल सुटले, पण त्याची भरपाई त्यांनी त्वरीत केली. ( India vs South Africa 3rd T20I चे संपूर्ण धावफलक पाहण्यासाठी क्लिक करा)
ऋतुराजने दमदार सुरुवात करून देताना आफ्रिकेच्या गोलंदाजांवर दडपण निर्माण केले. ऋतुराजने पाचव्या षटकात एनरिच नॉर्खियाला सलग ५ चौकार खेचले. भारताने ५.३ षटकांत फलकावर ५० धावा चढवल्या. त्याने पहिल्या विकेटसाठी ९७ धावांची भागीदारी केली. दक्षिण आफ्रिकेविरुद्ध भारतीय सलामीवीरांनी केलेली ही सर्वोत्तम भागीदारी ठरली. १०व्या षटकात केशव महाराजने ही भागीदारी तोडली. ३५ चेंडूंत ७ चौकार व २ षटकारांसह ५७ धावा करणाऱ्या ऋतुराजला त्याने अफलातून झेल घेत बाद केले.