IND vs SA 3rd T20I : भारतीय संघाने गुवाहाटी येथे विजय मिळवून दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या ट्वेंटी-२० मालिकेत २-० अशी विजयी आघाडी घेतली आहे. रोहित शर्मा हा दक्षिण आफ्रिकेविरुद्ध घरच्या मैदानावर ट्वेंटी-२० मालिका जिंकणारा भारताचा पहिला कर्णधार ठरला. ऑस्ट्रेलियात होणाऱ्या ट्वेंटी-२० वर्ल्ड कप स्पर्धेपूर्वी भारतीय खेळाडूंना सराव करता यावा यासाठी ऑस्ट्रेलिया व द. आफ्रिका मालिकेचे आयोजन केले आहे. भारताने चांगली कामगिरी करताना दोन्ही मालिका जिंकल्या. पण, अजूनही काही प्रश्न अनुत्तरीत आहेत. त्यातच आता माजी कर्णधार विराट कोहली (Virat Kohli) इंदौर येथे होणाऱ्या तिसऱ्या ट्वेंटी-२० सामन्यात खेळणार नसल्याचे वृत्त समोर येत आहे. आज सकाळी विराट मालिका सोडून मुंबईत दाखल झाला.
आता सूर्याला न खेळवण्याचाच विचार करतोय! Rohit Sharmaच्या विधानानं सारेच अवाक् Video
ऑस्ट्रेलिया व आफ्रिकेविरुद्धच्या मालिकेत रोहित शर्मा, लोकेश राहुल, सूर्यकुमार यादव, विराट कोहली, हार्दिक पांड्या यांची कामगिरी चांगली झालेली पाहायला मिळाली. श्रेयस अय्यर, मोहम्मद सिराज व उमेश यादव यांना आफ्रिकेविरुद्धच्या मालिकेत संधी मिळालेली नाही. त्यामुळे आता मालिका जिंकल्यानंतर तिसऱ्या सामन्यात भारताच्या प्लेइंग इलेव्हनमध्ये बदल पाहायला मिळू शकतो. आघाडीची फळी चांगली कामगिरी करत आहे, तर दिनेश कार्तिक दिलेली जबाबदारी सक्षमपणे पार पाडतोय. रिषभ पंतला अद्याप संधी मिळालेली नाही. त्यामुळे त्याला संधी मिळावी यासाठी सूर्या, विराट किंवा लोकेश यांना विश्रांती दिली जाऊ शकते.
पण, आता विराटच मुंबईत परतल्याचे फोटो व्हायरल झाल्याने तो तिसऱ्या सामन्यात खेळणार नसल्याची चर्चा सुरू झालीय. ऑस्ट्रेलियाला रवाना होण्यापूर्वी त्याने तीन दिवसांची विश्रांती घेतली आहे. इंग्लंड दौऱ्यानंतर विराट विश्रांतीवर होता. दीड महिन्यांनंतर त्याने आशिया चषक २०२२ स्पर्धेतून कमबॅक केले व अफगाणिस्तानविरुद्धच्या सामन्यात शतक झळकावले. त्यानंतर ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या मालिकेतही त्याने समाधानकारक कामगिरी केली. आफ्रिकेविरुद्धच्या दोन सामन्यांत त्याने ३ व ४९* अशी खेळी केली. दुसऱ्या सामन्यात त्याने ट्वेंटी-२० क्रिकेटमध्ये ११ हजार धावा करणाऱ्या पहिल्या भारतीय फलंदाजाचा विक्रम नावावर केला. १९व्या षटकात तो ४९ धावांवर नाबाद होता, अखेरच्या षटकात दिनेश कार्तिक स्ट्राईकवर होता अन् त्याने विराटला एक धाव काढून स्ट्राईक देतो असेही म्हटले, पण विराटने संघासाठी धावा कर असे त्याला सांगितले.
ट्वेंटी-२०त सर्वाधिक धावा करणारे फलंदाज
- ख्रिस गेल - १४५६२
- किरॉन पोलार्ड - ११९१५
- शोएब मलिक - ११९०२
- विराट कोहली - ११०००*
सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"