India vs South Africa, 3rd Test Day 2 Live Updates : भारतीय संघाच्या पहिल्या डावाताली २२३ धावांच्या प्रत्युत्तरात दक्षिण आफ्रिकेनं दुसऱ्या दिवसाच्या लंच ब्रेकपर्यंत ३ बाद १०० धावा केल्या आहेत. जसप्रीत बुमराहनं आफ्रिकेच्या दोन्ही सलामीवीरांना १७ धावांवर माघारी पाठवल्यानंतर केशव महाराज व किगन पीटरसन यांनी डाव सावरला. उमेश यादवनं महाराजची विकेट घेतली, परंतु पीटरसनला आता रॅसी व्हॅन डेर ड्युसेन याची साथ मिळाली आहे. दरम्यान, फलंदाजीत कमालीचा संयम दाखवणाऱ्या विराट कोहलीचा क्षेत्ररक्षणात पारा चढलेला पाहायला मिळाला. मैदानावरील पंच मेरैस इरास्मस यांनी भारतीय गोलंदाज मोहम्मद शमी याला दम भरताच कर्णधार कोहली त्यांच्या अंगावर धावून गेल्याचे पाहायला मिळाले.
भारताच्या २२३ धावांच्या प्रत्युत्तरात पहिल्या दिवसात जसप्रीत बुमराहनं आफ्रिकेचा कर्णधार डीन एल्गर याची विकेट घेतली आणि दुसऱ्या दिवसाच्या दुसऱ्याच षटकात त्यानं आफ्रिकेला आणखी एक धक्का दिला. एडन मार्करामचा त्रिफळा उडवून बुमराहनं आफ्रिकेची अवस्था २ बाद १७ अशी केली. उमेश यादवनं तिसरा धक्का देताना केशव महाराजला ( २५) त्रिफळाचीत केले. महाराज व पीटरसन हे खेळपट्टीवर असताना विराट व पंच यांच्यातील तो प्रसंग घडला. दुसऱ्या दिवसाच्या पहिल्या सत्रातील १३व्या षटकात इरास्मस यांनी शमीला खेळपट्टीच्या डेंजर झोनमध्ये पाऊल टाकत असल्याची वॉर्निंग दिली. त्यानंतर विराटचा पारा चढला.
डेंजर झोनच्या अगदी नजीकहून शमीचा फॉलोथ्य्रू पडत असल्याचे अनेकदा जाणवले. पण, अखेर पंचांनी शमीला वॉर्निंग दिली. मात्र, रिप्लेमध्ये शमीचा पाय डेंजर झोनच्या बाहेर असल्याचे दिसले आणि विराट नराज झाला. तो लगेच अम्पायरकडे धावला आणि या मुद्यावर त्यांच्याशी चर्चा करू लागला, परंतु नंतर दाखवण्यात आलेल्या रिप्लेमध्ये शमीनं तीन वेळा डेंजर झोनमध्ये पाय ठेवल्याचे दिसले.
पाहा व्हिडीओ..