India vs South Africa, 3rd Test Day 2 Live Updates : जसप्रीत बुमराह ( Jasprit Bumrah) नं दक्षिण आफ्रिकेचा निम्मा संघ माघारी पाठवून भारताला पहिल्या डावात आघाडी मिळवून दिली. मोहम्मद शमी व उमेश यादव यांनी त्याला चांगली साथ दिली. भारताच्या पहिल्या डावातील २२३ धावांच्या प्रत्युत्तरात आफ्रिकेचा पहिला डाव २१० धावांवर गडगडला. भारताला आता दुसऱ्या डावात चांगली कामगिरी करून दाखवण्याची संधी होती. पण, लोकेश राहुल ( १०) व मयांक अग्रवाल ( ७) हे सलामीवीर याही डावात अपयशी ठरले. भारतानं दुसऱ्या दिवसअखेर २ बाद ५७ धावा करताना ७० धावांची आघाडी घेतली आहे. विराट कोहली ३९ चेंडूंत १४ व चेतेश्वर पुजारा ३१ चेंडूंत ९ धावांवर नाबाद आहे. दक्षिण आफ्रिकेत कसोटी क्रिकेटमध्ये ५०ची सरासरी राखणारा विराट हा एकमेव आशियाई फलंदाज ठऱला आहे.
विराट कोहलीच्या ७९ आणि चेतेश्वर पुजाराच्या ४३ धावांच्या जोरावर भारतानं पहिल्या डावात २२३ धावा केल्या. कागिसो रबाडा व मार्को जॅन्सेन यांनी अनुक्रमे ४ व ३ विकेट्स घेतल्या. प्रत्युत्तरात जसप्रीत बुमराहनं आफ्रिकेच्या दोन्ही सलामीवीरांना १७ धावांवर माघारी पाठवले. उमेश यादवनं तिसरा धक्का देताना केशव महाराजला ( २५) त्रिफळाचीत केले. पण, किगन पीटरसन खेळपट्टीवर शड्डू ठोकून बसला. सुरुवातीला त्यानं रॅसी व्हॅन डेर ड्युसेनसह ११४ चेंडूंत ६७ धावांची भागीदारी केली आणि त्यानंतर टेम्बा ववुमासह ९७ चेंडूंत ४२ धावा केल्या. यादरम्यान पीटरसननं या मालिकेतील त्याचे दुसरे अर्धशतक पूर्ण केले. उमेश यादवनं ड्युसेनला ( २१) बाद केले.
पीटरसन व ववुमा ही जोडी भारताला डोईजड झाली होती आणि तेव्हा विराटनं मोहम्मद शमीला पाचारण केले. ५६ षटकाच्या दुसऱ्या चेंडूवर शमीनं बवुमाला ( २८) झेलबाद केले. त्यानंतर चौथ्या चेंडूवर कायले वेरेयने ( ०) रिषभ पंतच्या हाती झेल देऊन माघारी परतला. त्यानंतर बुमराहनं धक्के देण्यास सुरुवात केली. त्यानं सर्वात मोठी विजय मिळवून देताना १६६ चेंडूंत ९ चौकारांसह ७२ धावा करणाऱ्या पीटरसनला बाद केलं. कागिसो रबाडा आणि ड्युआने ऑलिव्हर यांनी ९व्या विकेटसाठी महत्त्वाच्या २१ धावा जोडून आफ्रिकेला दोनशेपार नेले. बुमराहनं आफ्रिकेला अखेरचा धक्का देताना त्यांचा पहिला डाव २१० धावांवर गुंडाळला. बुमराहनं या सामन्यात ४२ धावांत ५ विकेट्स घेतल्या. यादव व शमी यांनी प्रत्येकी दोन विकेट्स घेतल्या.
Web Title: IND vs SA, 3rd Test Day 2 Live Updates : Virat Kohli is Only Asian In the History Of Cricket Average 50+ in South Africa, Ind 57/2, a lead of 70
Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.