India vs South Africa, 3rd Test Day 4 Live Updates : दक्षिण आफ्रिकेनं तिसरी कसोटी ७ विकेट्स राखून जिंकताना मालिका २-१ अशी खिशात घातली. तीन सामन्यांच्या कसोटी मालिकेत १-० अशी आघाडी मिळवून मालिका गमावण्याची भारताची ही चौथी वेळ ठरली. यापूर्वी १९८४-८५ मध्ये इंग्लंड ( Home), २००६-०७ मध्ये दक्षिण आफ्रिका ( Away), २०१२-१३मध्ये इंग्लंड ( Home) यांच्याविरुद्ध भारताला मालिका पराभव पत्करावा लागला होता. या पराभवाचा भारताचा आणखी एक मोठा धक्का बसला आहे. जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धेत ( WTC ) भारताला आता फायनल गाठणे आणखी अवघड झाले आहे.
भारताच्या पहिल्या डावातील २२३ धावांच्या प्रत्युत्तरात दक्षिण आफ्रिकेला २१० धावाच करता आल्या, परंतु त्यांच्या गोलंदाजांनी भारताचा दुसरा डाव १९८ धावांवर गुंडाळला. दक्षिण आफ्रिकेनं २१२ धावांचे माफक लक्ष्य पार करून मालिका २-१ अशी खिशात घातली. किगन पीटरसन हा आफ्रिकेच्या विजयाचा नायक ठरला. आफ्रिकेनं ०-१ अशा पिछाडीवरून ही मालिका जिंकली. रिषभनं ४ बाद ५८ धावांवरून टीम इंडियाचा डाव सावरताना विराटसोहत ९४ धावांची भागीदारी केली. विराट माघारी परतला अन् भारतीय फलंदाजांनी रांग लावली. भारताचा दुसरा डाव १९८ धावांवर गडगडला. त्यात रिषभच्या नाबाद १०० धावा होत्या. त्यानं १३९ चेंडूंत ६ चौकार व ४ षटकारांसह नाबाद १०० धावा केल्या . भारतानं दुसऱ्या डावात १९८ धावा करताना आफ्रिकेसमोर विजयासाठी २१२ धावांचे लक्ष्य ठेवले.
एडन मार्कराम ( १६) याला माघारी पाठवून शमीनं भारताला विजयाचे स्वप्न दाखवले. पण, एल्गर व किगन पीटरसन यांनी त्या स्वप्नांचा चुराडा केला. या दोघांनी दुसऱ्या विकेटसाठी ७८ धावांची भागीदारी केली. एल्गर ९६ चेंडूंत ३० धावा केल्या. पीटरसननं अन् व्हॅन डेर ड्युसेनसह तिसऱ्या विकेटसाठी अर्धशतकी भागीदारीही पूर्ण केली. शार्दूल ठाकूर पुन्हा एकदा पार्टनरशीप ब्रेकर ठरला. त्यानं भारताला महत्त्वाची विकेट मिळवून देताना पीटरसनचा त्रिफळा उडवला. पीटसरन ११३ चेंडूंत १० चौकारांसह ८२ धावांवर माघारी परतला. पेव्हेलियनच्या दिशेनं पीटरसनचं साऱ्यांनी टाळ्यांच्या कडकडाटात उभं राहुन कौतुक केलं. या विकेटनं भारताच्या विजयाच्या आशा पल्लवीत केल्या, पण ड्युसेन व टेम्बा बवुमानं तसं होऊ दिले नाही. या दोघांनी नाबाद अर्धशतकी भागीदारी करून दक्षिण आफ्रिकेला ७ विकेट्स राखून विजय मिळवून दिला.
या पराभवामुळे भारताची जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धेच्या गुणतालिकेत पाचव्या स्थानी घसरण झाली आहे. आफ्रिकेनं ६६.६७ अशा टक्केवारीसह चौथ्या क्रमांकावर झेप घेतली आहे.