India vs South Africa, 3rd Test Day 4 Live Updates : तुमच्याकडून रिषभ पंत, तर आमच्याकडून किगन पीटरसन... दक्षिण आफ्रिकेच्या या खेळाडूनं चौथ्या डावात तिसरे अर्धशतक झळकावून भारताच्या विजयाच्या मार्गात मोठा अडथळा उभा केला. २४ वर्षीय खेळाडूची परिपक्वता पाहून आफ्रिकेचा महान फलंदाज एबी डिव्हिलियर्स यानंही कौतुकाचा पूल बांधला. भारताला पीटरसनची विकेट घेण्याची संधी चालून आली होती, परंतु चेतेश्वर पुजारानं चूक केली..
रिषभ पंतनं तिसऱ्या कसोटीचा तिसरा दिवस गाजवला. ४ बाद ५८ अशा अवस्थेत असलेल्या टीम इंडियाला रिषभ पंत व विराट कोहली या जोडीनं सावरलं. पण, विराट माघारी परतल्यानंतर रिषभनं परिपक्व खेळ करताना समाधानकारक पल्ला गाठून दिला. त्यानं १३९ चेंडूंत ६ चौकार व ४ षटकारांसह नाबाद १०० धावा केल्या . भारतानं दुसऱ्या डावात १९८ धावा करताना आफ्रिकेसमोर विजयासाठी २१२ धावांचे लक्ष्य ठेवले.
एडन मार्कराम ( १६) याला शमीनं पुन्हा एकदा बाद करून आफ्रिकेला २३ धावांवर पहिला धक्का दिला. पण, त्यानंतर एल्गर व पीटरसन यांनी भारतीय गोलंदाजांना हैराण केलं. धैर्यानं सामना केला. एल्गरला २२ धावांवर असताना आर अश्विननं LBW केले, परंतु त्यानं DRS घेतला. त्यात चेंडू यष्टिंवरून जात असल्याचे रिप्लेत दिसताच विराटचा पारा चढला... एल्गरला जीवदान मिळाले. पण, त्यानंतर पुढे जसप्रीत बुमराहच्या गोलंदाजीवर याच DRS मध्ये एल्गर झेलबाद झाल्याचे स्पष्ट झाले अन् भारताला अखेर त्याची विकेट मिळवण्यात यश आले. एल्गर ९६ चेंडूंत ३० धावा करून बाद झाला अन् पीटरसनसोबतची त्याची ७८ धावांची भागीदारी संपुष्टात आली.
चौथ्या दिवशी DRS वर पुन्हा एकदा विराट चिडला. मोहम्मद शमीच्या गोलंदाजीवर रॅसी व्हॅन डेर ड्युसन स्ट्राईकवर होता अन् चेंडू त्याच्या बॅट जवळून रिषभ पंतच्या हाती विसावला. कॅचची जोरदार अपील झाली. पण, मैदानावरील अम्पायरनं नाबाद निर्णय दिला. रिषभ पंत लगेच विराटकडे जाऊन DRS घेण्यासाठी विनंती करू लागला, शमी DRS घेण्याच्या पक्षात नव्हता. पण, विराटनं अखेरच्या क्षणाला DRS घेण्याचा निर्णय घेतला. रिप्लेमध्ये चेंडू बॅटच्या नजीकहून जाताना स्निकोमीटरमध्ये कट लागल्याचे दिसत होते, पण त्याचवेळी फलंदाजाची बॅटही मैदानावर आदळली. त्यामुळे तिसऱ्या अम्पायरनं ते गृहीत धरून नाबाद निर्णय दिला.
यानंतर जसप्रीत बुमराहच्या गोलंदाजीवर पीटरसनची विकेट घेण्याची संधी टीम इंडियाला चालून आली होती. पीटरसनची एकाग्रता भंगली अन् बुमराहनं टाकलेला चेंडू त्याच्या बॅटची किनार घेत दुसऱ्या स्लिपमध्ये उभ्या असलेल्या पुजाराच्या दिशेनं गेला. पण, पुजारानं हा झेल सोडला अन् टीम इंडियासाठी कुठे विजयाचे दार उघडत होते, ते बंद झाले. त्यानंतर पीटरसननं आक्रमक खेळ करण्यास सुरुवात केली अन् व्हॅन डेर ड्युसेनसह तिसऱ्या विकेटसाठी अर्धशतकी भागीदारीही पूर्ण केली.
पाहा व्हिडीओ...
Web Title: IND vs SA, 3rd Test Day 4 Live Updates : Keegan Petersen dropped by Cheteshwar Pujara on 59, Watch Video
Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.