India vs South Africa, 3rd Test : सेंच्युरियन कसोटी जिंकल्यानंतर भारतीय संघ जोहान्सबर्गमध्येही विजय मिळवून इतिहास घडवेल, असेच वाटत होते. पण, दक्षिण आफ्रिकेनं सॉलिड कमबॅक केलं आणि जोहान्सबर्ग कसोटीत ७ विकेट्स राखून विजय मिळवताना मालिका १-१ अशी बरोबरीत आणली. २९ वर्षांत भारताला दक्षिण आफ्रिकेत कसोटी मालिका जिंकता आलेली नाही आणि जोहान्सबर्गवर भारत कधी हरला नव्हता. त्यामुळे टीम इंडिया येथे इतिहास घडवण्यासाठी तयार होती, परंतु डीन एल्गरनं त्यांच्या मालिका विजयाच्या मार्गात खोडा घातला. आता मालिकेतील तिसरा व अंतिम सामना केप टाऊनच्या न्यूलँड्स क्रिकेट ग्राऊंडवर होणार आहे. ११ जानेवारीपासून या कसोटीला सुरुवात होणार आहे.
भारताच्या पहिल्या डावातील २०२ धावांच्या प्रत्युत्तरात यजमान आफ्रिकेनं २२९ धावा केल्या. शार्दूल ठाकूरनं ६१ धावांत ७ विकेट्स घेत आफ्रिकेला मोठी आघाडी घेऊ दिली नाही. चेतेश्वर पुजारा, अजिंक्य रहाणे यांची अर्धशतकी खेळी अन् हनुमा विहारीच्या नाबाद ४० धावांच्या जोरावर भारतानं २६६ धावा करून आफ्रिकेसमोर २४० धावांचे लक्ष्य ठेवले. आफ्रिकेचा कर्णधार डीन एल्गर १८८ चेंडूंचा सामना करताना १० चौकारांच्या मदतीनं ९६ धावांवर नाबाद राहिला. एडन मार्कराम ( ३१), रॅसी व्हॅन डेर ड्युसेन ( ४०), किगन पीटरसन ( २८) आणि टेम्बा बवुमा ( २३*) यांनी योगदान दिलं. जोहान्सबर्गवर भारताचा हा पहिलाच कसोटी पराभव ठरला. यापूर्वी झालेल्या पाच सामन्यांत भारतानं दोन विजय मिळवले होते, तर तीन सामने ड्रॉ केले होते. राहुल द्रविड व विराट कोहली यांच्या नेतृत्वाखाली हे दोन्ही विजय आले होते.
आता साऱ्यांचे लक्ष केपटाऊन कसोटीवर लागले आहे. येथील कसोटी क्रिकेटचा इतिहास भारतासाठी काही खास नाही. १९९३ ते २०१८ या कालावधीत भारतानं येथे ५ कसोटी सामने खेळले आणि त्यापैकी तीनमध्ये त्यांचा पराभव झाला आहे, तर दोन सामने ड्रॉ राहिले आहेत. २०१८च्या मालिकेतील पहिलाच सामना इथे खेळला गेला होता आणि त्यात भारताला ७२ धावांनी हार मानावी लागली होती.
तेच दक्षिण आफ्रिकेनं येथे खेळलेल्या ५८ पैकी २६ सामन्यांत विजय मिळवला आहे, तर २१ सामन्यांत त्यांचा पराभव झाला आहे. येथे कसोटी ड्रॉ होण्याचं प्रमाण कमी आहे आणि केवळ ११ सामने ड्रॉ राहिले आहेत.