IND vs SA, 3rd Test Cape Town: भारत-दक्षिण आफ्रिका कसोटी मालिका आता १-१ अशी बरोबरीत आहे. केपटाउनच्या मैदानावर आजपासून तिसरा कसोटी सामना खेळवला जाणार आहे. या कसोटी सामन्यासाठी विराट कोहली फिट असल्याने तो संघात नक्कीच पुनरागमन करणार आहे. दुसऱ्या सामन्यात तो दुखापतीमुळे संघाबाहेर होता. तसेच, मोहम्मद सिराज दुखापतग्रस्त असल्याने त्याच्या जागी उमेश यादव किंवा इशांत शर्माला संघात स्थान दिलं जाणार हे जवळपास निश्चित आहे. परंतु भारताच्या माजी क्रिकेटपटूने या व्यतिरिक्त संघात एक वेगळा बदल सुचवला आहे.
भारताने दुसरा कसोटी सामना गमावला. या सामन्यात विराट कोहली दुखापतीमुळे संघाबाहेर होता. त्याच्या जागी हनुमा विहारीला संघात स्थान देण्यात आले. विहारीने खेळपट्टीचा पोत पाहता संघर्षपूर्ण खेळी केली. पण आता विराट तंदुरूस्त झाल्याने आपोआपच विहारीला संघाबाहेर व्हावे लागणार आहे. पण भारताचा माजी क्रिकेटपटू आणि प्रसिद्ध समालोचक आकाश चोप्राच्या मते, विराट आणि हनुमा विहारी दोघांनाही संघात जागा देणं शक्य आहे. त्याजागी एका वेगळ्याच खेळाडूला संघाबाहेर करावं असं मत त्याने व्यक्त केलं आहे.
"मला असं वाटतं की केपटाउन कसोटीत रविचंद्रन अश्विनला संघात खेळवावं की नाही यावर संघ व्यवस्थापनाने एकदा नीट विचार करायला हवा. दक्षिण आफ्रिकेच्या खेळपट्ट्या या वेगवान गोलंदाजीला पोषक आहेत. त्यामुळे अश्विनला फारशी षटकं टाकायला मिळत नाहीयेत. अश्विन जितकी षटकं टाकतोय तितकीच षटकं हनुमा विहारीदेखील टाकू शकतो. पण फायदा असा की विहारीच्या फलंदाजीचा स्तर हा अश्विनपेक्षा वरचा आहे", असं आकाश चोप्रा म्हणाला. त्याने पुढेदेखील आपलं म्हणणं पटवून देण्याचा प्रयत्न केला.
"संघात चार वेगवान गोलंदाज आणि पाचवा हनुमा विहारी अशी टीम इंडिया असायला हवी. कारण गेल्या काही डावात भारतीय फलंदाज फारशा धावा करत नाहीयेत. तशातच विराट संघात आला म्हणजे कोणाला तरी तुम्हाला संघातून बाहेर बसवावंच लागणार आहे. मग अशा परिस्थितीत विहारीच्या जागी अश्विनला संघाबाहेर बसवणं जास्त सोयीचं असेल", असंही आकाश चोप्राने सांगितलं.