Virat Kohli, IND vs SA, 3rd Test Live Updates : भारत-दक्षिण आफ्रिका यांच्यातल्या तिसऱ्या कसोटीच्या तिसऱ्या दिवशी जेवढी चर्चा रिषभ पंतच्या खेळीची झाली नाही त्याहून अधिक विराट कोहलीच्या वागण्याची होताना दिसतेय. आफ्रिकेचा कर्णधार डीन एल्गर फिरकीपटू आर अश्विनच्या गोलंदाजीवर LBW असल्याचा निर्णय मैदानावरील पंचांनी दिला. पण, DRS मध्ये तो बदलला गेला. तिसऱ्या अम्पायरच्या निर्णयानं सारेच अवाक् झाले, मैदानावरील पंचांनीही आश्चर्य व्यक्त केलं. त्यानंवर विराट कोहली स्टम्प्स माईकवर जाऊन बरळला अन् तो व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला. विराटच्या या कृतीवर संमिश्र प्रतिक्रिया येत असताना आफ्रिकेचा गोलंदाज लुंगी एनगिडी ( Lungi Ngidi) यानं मोठं विधान केलं.
भारतानं विजयासाठी ठेवलेल्या २१२ धावांच्या प्रत्युत्तरात मैदानावर उतरलेल्या आफ्रिकेला मोहम्मद शमीनं झटका दिला. एडन मार्कराम ( १६) याला शमीनं पुन्हा एकदा बाद करून आफ्रिकेला २३ धावांवर पहिला धक्का दिला. पण, त्यानंतर मात्र कर्णधार डीन एल्गर व किगर पीटरसन यांनी दमदार खेळ केला. एल्गरला २२ धावांवर असताना आर अश्विननं LBW केले, परंतु त्यानं DRS घेतला. त्यात चेंडू यष्टिंवरून जात असल्याचे रिप्लेत दिसताच विराटचा पारा चढला... एल्गरला जीवदान मिळाले.
नेमकं काय घडलं?आर अश्विननं टाकलेला चेंडू एल्गरच्या पॅडवर आदळला अन् सर्वांना जोरदार अपील केले. मैदानावरील पंच एराम्सस यांनी लगेच बोट वर केले. मोठी विकेट मिळाली म्हणून भारतीय खेळाडू आनंदात होते. पण, एल्गरनं लगेच DRS घेतला. चेंडू यष्टींवर आदळत असल्याचा विश्वास सर्वांनाच होता, पण रिप्लेत चेंडू स्टम्प्सच्या वरून जाताना दिसला अन् एराम्सस यांना निर्णय बदलावा लागला. त्यावेळेस त्यांनीही हे शक्य नाही अशीच प्रतिक्रिया दिली.
लुंगी एनगिडी काय म्हणतोय?''अशा प्रकारचं वागणं हे त्या खेळाडूची नैराश्या दाखवतं. कधीकधी प्रतिस्पर्धी संघाला याचा फायदाही होतो. तुम्ही अशा प्रकारे भावना व्यक्त करता कामा नये, यातून हेच दिसते की तो प्रचंड दबावात आहे,''असे म्हणून एनगिडीनं विराटला पराभव दिसत असल्याचे मत अप्रत्यक्षपणे मांडले.