India vs South Africa, 3rd Test Live Updates : विराट कोहली ( Virat Kohli) आणि चेतेश्वर पुजारा यांच्या योगदानाच्या जोरावर टीम इंडिया पहिल्या डावात २२३ धावा करू शकली. १६७ धावांवर भारताची पाचवी विकेट पडली आणि त्यानंतर उर्वरित निम्मा संघ ५६ धावांवर माघारी परतला. कागिसो रबाडा व मार्को जॅन्सेन यांनी टीम इंडियाचा पहिला डाव गुंडाळला. कंबरेत उसण भरल्यामुळे दुसरा सामना मुकलेल्या विराटनं आज दमदार कमबॅक केले. त्याच्या खेळात आज कमालीची एकाग्रता दिसली आणि बाहेर जाणाऱ्या चेंडूशी छेडछाड करण्याचा मोह त्यानं कटाक्षानं टाळला. महान फलंदाज सुनील गावस्कर यांनीही त्याचे कौतुक केले. पण, अन्य फलंदाजांनी आज निराश केले.
लोकेश व मयांक यांनी आज निराश केले. राहुल व मयांक यांनी अनुक्रमे १२ व १५ धावा केल्या आणि भारताला ३३ धावांवर दोन धक्के बसले. पुजारा व विराट यांनी चांगला खेळ करून संघाचा डाव सावरला. विराटच्या कव्हर ड्राईव्हनं साऱ्यांची वाहवाह मिळवली आहे. पुजारानं ७७ चेंडूंत ७ चौकारांसह ४३ धावा केल्या. अजिंक्य रहाणे पुन्हा अपयशी ठरला. विराटनं रिषभ पंतला मार्गदर्शन करताना संघाचा डोलारा सावरला. रिषभही संयमानं खेळताना दिसला. टी ब्रेकनंतर पाहून घेऊ असं विराट पंतला सांगत होता, परंतु आफ्रिकेच्या गोलंदाजांनी डाव साधला. त्यांनी रणनिती आखून पंतला ( २७) माघारी पाठवले. दरम्यान, विराटनं कसोटी क्रिकेटमधील २८ वे अर्धशतक पूर्ण करताना सॉलिड कमबॅक केले.
पण, त्याला साथ देण्यात आज आर अश्विन व शार्दूल ठाकूर कमी पडले. अश्विन ( २) मार्को जॅन्सेनच्या गोलंदाजीवर बाद झाला. शार्दूलनं चौकार-षटकार मारून धावांचा वेग वाढवण्याचा प्रयत्न केला, परंतु केशव महाराजनं त्याला जाळ्यात अडकवले. शार्दूल १२ धावांवर बाद झाला. जसप्रीत बुमराह भोपळा न फोडताच माघारी परतला. टीम इंडियासाठी एक बाजूनं खिंड लढवणाऱ्या विराटची विकेटही रबाडाला मिळाली. विराट २०१ चेंडूंत १२ चौकार व १ षटकार खेचून ७९ धावांवर झेलबाद झाला. त्यानंतर आफ्रिकेनं टीम इंडियाचा पहिला डाव २२३ धावांवर गुंडाळला. कागिसो रबाडानं ७३ धावांत ४, मार्को जॅन्सेननं ५५ धावांत ३ विकेट्स घेतल्या. ड्युआने ऑलिव्हर, लुंगी एनगिडी व केशव महाराज यांनी प्रत्येकी १ विकेट घेतली.
जोहान्सबर्ग कसोटी गाजवणारा आफ्रिकेचा कर्णधार डीन एल्गर आज अपयशी ठरला. जसप्रीत बुमराहनं ५व्या षटकात त्याला माघारी पाठवून भारताला मोठं यश मिळवून दिलं. पहिल्या दिवसाचा खेळ संपला तेव्हा आफ्रिकेनं १ बाद १७ धावा केल्या होत्या. ते अजूनही २०६ धावांनी पिछाडीवर आहेत आणि ९ विकेट्स त्यांच्या हातात आहेत.
Web Title: IND vs SA, 3rd Test Live Updates : South Africa at 17/1 on Day 1 Stumps, Africa trail by 206 runs in the first innings with 9 wickets in hand
Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.