IND vs SA, 3rd Test: भारतीय संघाच्या फलंदाजांनी तिसऱ्या कसोटीच्या पहिल्या दिवशी चाहत्यांना निराश केलं. कर्णधार विराट कोहलीचं झुंजार अर्धशतक (७९) वगळता एकाही फलंदाजाने मोठी खेळी केली नाही. आफ्रिकेत आतापर्यंत भारताने एकदाही कसोटी मालिका जिंकलेली नाही. सध्या मालिका १-१ अशी बरोबरीत असल्याने शेवटची कसोटी जिंकून इतिहास बदलण्याची संधी भारताकडे आहे. भारताने पहिल्या डावात फ्लॉप शो केला असला तरी अजूनही टीम इंडियाची संधी गेलेली नाही. पाहूया याच संबंधीची काही आकडेवारी...
भारताचा पहिला डाव २२३ धावांवर आटोपला. आकडेवारीनुसार, भारताचा कसोटीतील एखादा डाव २२५ धावांपेक्षा कमीवर आटोपला तर अशा वेळी भारताने १४ सामने जिंकले आहेत आणि तब्बल ४७ सामने गमावले आहेत. तसेच, १३ सामने अनिर्णित राखण्यात आलेत. असं असलं तरी भारतासाठी काही दिलासादायक आकडेवारी अशी की, भारताने २२५पेक्षा कमी धावा करूनही भारतचा सर्वात ताजा विजय हा परदेशी भूमीवर ओव्हलच्या मैदानावरच झाला. सप्टेंबर २०२१ मध्ये भारताने इंग्लंडला त्यांच्या भूमीवर नमवलं.
आफ्रिकेतही भारताचा फ्लॉप शो काही अंशी दिलासादायकच ठरला आहे. भारताने २२५ पेक्षा कमी धावा केल्यानंतर आफ्रिकेत दोन वेळा विजय मिळवले आहेत. डिसेंबर २०१० मध्ये डर्बनच्या मैदानावर २०५ धावांवर भारताचा डाव संपला होता, तर जानेवारी २०१८ मध्ये जोहान्सबर्गला १८७ भारतीय संघ गारद झाला होता. पण तरीही हे दोन्ही सामने भारताने जिंकले होते.
आणखी एक योगायोगाची गोष्ट म्हणजे, दक्षिण आफ्रिकेविरूद्ध एका कसोटीत भारताचा पहिला डाव २२३ धावांवरच आटोपला होता. नोव्हेंबर १९९६ साली अहमदाबादमध्ये ही कसोटी रंगली होती. या कसोटीत भारताचे दोन डाव २२३ आणि १९० असे संपुष्टात आले होते. पण आफ्रिकेला २४४ आणि १०५ अशी दोन डावात मजल मारता आली होती आणि भारताने ती कसोटी ६४ धावांनी जिंकला होता.