भारतीय संघाने विराट कोहलीच्या नेतृत्वाखाली पहिली कसोटी जिंकली. सेंच्युरियनवर आफ्रिकेला पराभूत करणारा पहिला आशियाई संघ ठरण्याचा मान भारताने मिळवला. या ऐतिहासिक विजयानंतर दुसरी कसोटी मात्र भारताने गमावली. विराटच्या दुखापतीमुळे केएल राहुलला कर्णधार करण्यात आले. पण त्याच्या नेतृत्वाखाली संघाला पराभव पत्करावा लागला. या सामन्यात विराटच्या नेतृत्वशैलीची उणीव भासल्याचं मत अनेकांनी व्यक्त केलं. तिसऱ्या कसोटीच्या पूर्वसंध्येला विराटने पत्रकार परिषद घेत स्वत: सामन्यासाठी तंदुरूस्त असल्याची ग्वाही दिली. याचवेळी त्याने केएल राहुलच्या कॅप्टन्सीबद्दलही महत्त्वाचं विधान केलं.
"केएल राहुल संघाचं नेतृत्व करत असताना दक्षिण आफ्रिकन फलंदाजांना बाद करण्याचा प्रयत्न करत होता. पण आफ्रिकन फलंदाजांनी खरंच खूप चांगली फलंदाजी केली. मला तरी असं वाटत नाही की त्याने जे केलं त्यापेक्षा वेगळं काही त्याला करता आलं असतं. त्यावेळी जे योग्य वाटलं ते तो करत होता. मी त्या जागी मैदानात संघाचं नेतृत्व करत असतो तर मी नक्कीच काही तरी वेगळ्या पद्धतीने विचार केला असता. पण माझाही प्रयत्न विकेट्स काढणं हाच असता. प्रत्येक खेळाडूंची कर्णधार म्हणून विचार करण्याची पद्धत थोडीशी वेगळी असते. प्रत्येकाच्या नेतृत्वशैलीत थोडाफार फरक असतोच. पण राहुलने जे त्यावेळी केलं ते त्याच्यानुसार योग्यच होतं", अशा शब्दात विराट कोहलीने राहुलच्या नेतृत्वशैलीची पाठराखण केली.
विराट कोहलीने पत्रकार परिषदेत काही महत्त्वाच्या विषयांवर प्रकाश टाकला. विराट स्वत: तंदुरूस्त असल्याने तो उद्या संघाचे नेतृत्व करणार हे स्पष्ट झाले. त्यासोबतच वेगवान गोलंदाज मोहम्मद सिराज अद्याप दुखापतीतून पूर्णपणे सावरलेला नाही त्यामुळे तो संघाबाहेर असेल हेदेखील विराटने स्पष्ट केलं. मात्र, त्याच्या जागी संघात कोणाला स्थान मिळणार यावर त्याने भाष्य केलं नाही. याशिवाय, अजिंक्य रहाणे आणि चेतेश्वर पुजारा या अनुभवी जोडीबाबतही त्याने स्पष्टपणे मत मांडलं. या दोघांना अनुभव हा अमूल्य असून संघासाठी हे दोन्ही खेळाडू महत्त्वाचे आहेत, असंही विराट म्हणाला.