Virat Kohli, IND vs SA 3rd test: भारतीय संघाचा कर्णधार विराट कोहली तिसऱ्या कसोटीत पुन्हा एकदा संघात आला. दुखापतीमुळे तो दुसरी कसोटी खेळलेला नव्हता. पण तिसऱ्या आणि निर्णायक कसोटीत नाणेफेक जिंकून विराटने प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला. या सामन्यात सलामीवीर लोकेश राहुल आणि मयंक अग्रवालने स्वस्तात आपल्या विकेट्स बहाल केल्या. पण विराट कोहली आणि चेतेश्वर पुजारा यांनी डाव सांभाळला. सातत्याने ऑफ स्टंपच्या बाहेरील चेंडू मारून बाद होणाऱ्या विराट कोहलीने आपल्या चुकांमधून धडा घेत खेळात सुधारणा केल्याचं दिसून आलं.
विराट कोहली पहिल्या सामन्यात चांगली सुरूवात मिळाल्यानंतर बाद झाला होता. दोन्ही वेळी त्याने ऑफ स्टंपच्या बाहेर आलेल्या चेंडूवर फटका खेळण्याचा प्रयत्न केला होता. त्यात तो झेलबाद झाला होता. तोच प्लॅन तिसऱ्या सामन्यातही त्याच्या विरोधात वापरण्यात आला होता. पण विराटने चुकांमधून सुधारणा करून पहिले १५ चेंडू अक्षरश: सोडून दिले. आणि नंतर अखेरीस त्याने कव्हर ड्राईव्ह खेळत शानदार चौकार लगावला.
दरम्यान, विराटने तिसऱ्या कसोटीत नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला. विराटने या मालिकेत सलग दुसऱ्यांदा टॉस जिंकला. भारताच्या संघात या कसोटीसाठी दोन बदल करण्यात आले. दुखापतीतून सावरलेल्या विराटने पुन्हा एकदा कर्णधारपदाचा भार सांभाळला. त्याच्या जागी हनुमा विहारीला संघातून बाहेर करण्यात आले. तर दुसऱ्या कसोटीत दुखापतग्रस्त झालेल्या मोहम्मद सिराजला विश्रांती देण्यात आली असून त्याजागी वेगवान गोलंदाज उमेश यादवला संधी देण्यात आली.