भारतीय संघ सध्या आफ्रिका दौऱ्यावर आहे. या दौऱ्यातील टी२० आणि वन डे असे दोन टप्पे पार पडले. टी२० मालिका १-१ अशी बरोबरीत सुटली तर वन डे मालिका भारताने २-१ अशी जिंकली. आता या दौऱ्यातील शेवटचा टप्पा कसोटी मालिकेचा आहे. २६ ते ३० डिसेंबर दरम्यान पहिला कसोटी सामना खेळला जाणार आहे. तर दुसरा आणि अखेरचा सामना ३ ते ७ जानेवारी दरम्यान रंगणार आहे.
रोहित शर्माच्या नेतृत्वाखाली कसोटी संघ २६ तारखेपासून पहिली कसोटी खेळणार आहे. या सामन्यासाठी रोहितसह विराट कोहली, जसप्रीत बुमराह यांसारखे अनुभवी खेळाडू संघात परतणार आहेत. या मालिकेपूर्वीच भारताचा माजी सलामीवीर गौतम गंभीरने युवा खेळाडू यशस्वी जैस्वालबाबत मोठे वक्तव्य केले आहे. दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या पहिल्या कसोटीत जैस्वालने जास्त दडपण घेऊ नये, असे गौतम गंभीरने म्हटले आहे.
दक्षिण आफ्रिकेत खूप वेगळे आव्हान असेल. येथे, तुम्ही मार्को जॅनसेन, कागिसो रबाडा, लुंगी एनगिडी किंवा नांद्रे बर्गरसारखे गोलंदाज असल्यामुळे भारतीय फलंदाजांना मोठ्या प्रमाणात बाऊन्सचा सामना करावा लागू शकतो. यशस्वी जैस्वाल फ्रंट आणि बॅकफूटवर चांगला खेळतो, पण हे खूप वेगळे आव्हान असेल. मला विश्वास आहे की तो या अनुभवाने चांगला फलंदाज होईल. पहिल्याच सामन्यात युवा खेळाडू येऊन शतक किंवा द्विशतक झळकावेल, अशी फार अपेक्षा करू नका, असंही गंभीरने म्हटलं आहे.
अय्यर, राहुल, गिलला संधी-
जखमी मोहम्मद शमी दौऱ्यात नाही. तरी भारतीय संघ पूर्ण ताकदीनिशी खेळणार आहे. शमी नसल्याने जसप्रीत बुमराह- शमी आणि सिराज यांचे त्रिकूट विखुरले. तरी भारतीय संघ भक्कम आहे. फिरकीची बाजू सांभाळण्यास अश्विन आणि जडेजा सक्षम असून, प्रतिस्पर्धी संघाला कोंडीत पकडू शकतात. फलंदाजीत शुभमन गिल, यशस्वी जैस्वाल, रोहित शर्मा, विराट कोहली, लोकेश राहुल, श्रेयस अय्यर यांच्याकडून मोठी खेळी अपेक्षित असेल. चेतेश्वर पुजारा आणि अजिंक्य रहाणे यांच्या अनुपस्थितीत श्रेयस, राहुल, शुभमन गिल यांना प्रतिभा सिद्ध करण्याची मोठी संधी असेल.
डब्ल्यूटीसीसाठी कसोटी मालिका मोलाची-
सध्या भारतीय संघ कसोटीत कसा खेळेल, याकडे लक्ष लागले आहे. २६ डिसेंबरपासून पहिली कसोटी खेळली जाईल. ही मालिका २०२३-२०२५ च्या डब्ल्यूटीसीचा भाग आहे. याची सुरुवातदेखील झाली. विदेशात मालिका जिंकून गुण मिळविल्यास पुन्हा एकदा डब्ल्यूटीसी अंतिम फेरी गाठणे सुकर होणार आहे. डब्ल्यूटीसीच्या गेल्या दोन सत्रांत भारत अंतिम सामना तर खेळला, तर दोन्ही वेळा उपविजेतेपदावरच समाधान मानावे लागले होते. तेव्हा पुन्हा फायनल खेळण्यासाठी ही मालिका जिंकावी लागेलच. शिवाय महत्त्वाची बाब म्हणजे भारताने दक्षिण आफ्रिकेत अद्याप कसोटी मालिका विजय साजरा केलेला नाही.
Web Title: IND vs SA: 'A different challenge in South Africa, don't expect too much...'; Gautam Gambhir's opinion about yashshwi jaiswal
Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.