India vs South Africa: भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यातील वन डे मालिकेला १९ जानेवारी (आजपासून) सुरूवात होत आहे. दोन्ही संघ कसोटी क्रिकेट खेळून झाल्यावर आता नव्या ऊर्जेने वन डे सामने खेळणार आहेत. भारतीय संघ केएल राहुलच्या नेतृत्वाखाली मैदानात उतरणार आहे तर दक्षिण आफ्रिकेचा संघ टेंबा बावुमाच्या नेतृत्वाखाली खेळणार आहे. भारतीय संघ गेल्या वेळी जेव्हा आफ्रिकेत वन डे मालिका खेळला होता त्यावेळी भारताने मालिका विजय मिळवला होता. पण या मालिकेत मात्र भारतासाठी मालिका जिंकणं सोपं नसेल. यजमान संघाकडे असे अनेक खेळाडू आहेत जे भारतीय संघासाठी डोकेदुखी ठरू शकतात. असाच एक महत्त्वाचा खेळाडू म्हणजे, रॅसी वॅन डर डुसेन (Rassie Van Der Dussen). वन डे क्रिकेटमध्ये त्याची कामगिरी खूपच चांगली आहे.
वॅन डर डुसेनने २०१९ साली वन डे मध्ये पदार्पण केले. त्यानंतर त्याने मागे वळून पाहिलेलं नाही. सध्याच्या दक्षिण आफ्रिकेच्या संघात तो एक महत्त्वाचा फलंदाज आहे. वॅन डर डुसेनने भारताविरूद्ध केवळ एकच वन डे सामना खेळला आहे. त्यात त्याने २२ धावाच केल्या होत्या. पण वन डे कारकिर्दीतील त्याची आकडेवारी पाहता त्याने एकूण २९ सामन्यांमध्ये ६६च्या सरासीने १ हजार ४९ धावा केल्या आहेत. आतापर्यंत त्याने एक शतक आणि नऊ अर्धशतके झळकावली आहेत.
वॅन डर डुसेन हा मधल्या फळीतील फलंदाज आहे. तिसऱ्या क्रमांकावर फलंदाजी करताना त्याने १०१च्या सरासरीने धावा केल्या आहेत. तर चौथ्या क्रमांकावर त्याने ५८च्या सरासरीने धावा केल्या आहेत. पाचव्या क्रमांकावर खेळताना त्याने ६५च्या सरासरीने धावा केल्या आहेत. महत्त्वाची बाब म्हणजे डुसेन आजपर्यंत कधीही वन डे सामन्यात शून्यावर बाद झालेला नाही.