IND vs SA 1st Test: टीम इंडियाचे फलंदाजी प्रशिक्षक विक्रम राठोर यांनी भारतीय कसोटी संघाचा कर्णधार विराट कोहली ज्या पद्धतीने बाद झाला त्यावर आपली प्रतिक्रिया दिली आहे. विराटला गेल्या दोन वर्षांत एकही आंतरराष्ट्रीय शतक झळकावता आलेले नाही. ड्राइव्ह शॉट ही विराटची एके काळी सर्वात मोठी ताकद होती आणि त्याने या शॉटच्या माध्यमातून खूप धावाही केल्या आहेत. पण अनेकदा तो असा शॉट खेळतानाच बाद होताना दिसत आहे. विराट कोहलीने असा शॉट खेळणं का थांबवू नये, याबद्दल विक्रम राठोर यांनी मनमोकळेपणानं सांगितलं आहे.
विराट कव्हर ड्राईव्ह किंवा ऑफ ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न करताना यष्टीमागून झेल देत असल्यानं फलंदाजी प्रशिक्षक विक्रम राठोर यांना यासंदर्भात प्रश्न विचारण्यात आला. दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या पहिल्या कसोटीच्या चौथ्या दिवशीचा खेळ संपल्यानंतर राठोर म्हणाले, “त्याने (विराट) या शॉटच्या माध्यमातून खूप धावा केल्या आहेत आणि हा धावा मिळवून देणारा शॉट आहे. त्यानं तो शॉट खेळला पाहिजे. परंतु अनेकदा तुमची असलेली मजबूत बाजूच तुमची कमजोरीदेखील बनते. हा शॉट खेळताना त्याने चांगला चेंडू निवडला पाहिजे."
पुजारा, रहाणेबद्दलही भाष्यगेल्या काही काळापासून खराब फॉर्मचा सामना करणाऱ्या चेतेश्वर पुजारा आणि अजिंक्य रहाणेलाही त्यांनी पाठिंबा दिला. "ते आपलं बेस्ट देण्याचा प्रयत्न करत आहेत. रहाणे बाद होण्यापूर्वी चांगलं खेळताना दिसत होता. त्यांनी यापूर्वीही अनेकदा उत्तम खेळ खेळला होता. ही सर्वांसाठीच आव्हानात्मक स्थिती आहे. तुम्हाला संयमानं वागण्याची गरज आहे. जोपर्यंत तो बेस्ट देण्याचा प्रयत्न करतोय आणि बेस्ट खेळतोय, प्रशिक्षक म्हणून आम्हाला कोणतीही समस्या नाही," असंही त्यांनी स्पष्ट केलं.