India vs South Africa Full Schedule : आगामी ट्वेंटी-२० वर्ल्ड कप स्पर्धेची तयारी म्हणून BCCI ने ऑस्ट्रेलिया व दक्षिण आफ्रिका यांच्याविरुद्धच्या मालिकेचे आयोजन केले. भारतीय संघाने रोहित शर्माच्या नेतृत्वाखाली रविवारी ऑस्ट्रेलियाविरुद्धची मालिका २-१ अशी जिंकली. तिसऱ्या ट्वेंटी-२० सामन्यात १८७ धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना विराट कोहली व सूर्यकुमार यादव यांनी तुफान फटकेबाजी केली. भारताने ६ विकेट्स राखून सामना जिंकला आणि मालिकाही खिशात घातली. आता दोन दिवसांच्या विश्रांतीनंतर भारतीय संघ दुसऱ्या मालिकेसाठी मैदानावर उतरणार आहे. २८ सप्टेंबरपासून India vs South Africa 1st T20I याच्यातल्या मालिकेला सुरुवात होणार आहे. या मालिकेसाठी जाहीर झालेल्या संघात हार्दिक पांड्या व भुवनेश्वर कुमार यांना वगळण्यात आले आहे.
भारत-ऑस्ट्रेलिया ट्वेंटी-२० मालिकेत रोहित अँड कंपनीने मालिका जिंकली असली तरी गोलंदाजांची कामगिरी सुमार झाली. अक्षर पटेल वगळल्यास अन्य गोलंदाज प्रभाव पाडण्यात अपयशी ठरले. भुवनेश्वर कुमार हा महागडा गोलंदाज ठरला, तर पुनरागमन करणारा हर्षल पटेल व जसप्रीत बुमराह यांना प्रभाव पाडता आला नाही. तिसऱ्या सामन्यात जसप्रीतने ४ षटकांत ५० धावा दिल्या. विराट कोहली, रोहित, लोकेश राहुल, सूर्यकुमार यादव यांचा परतलेला फॉर्म ही संघासाठी खूप मोठी गोष्ट आहे. हार्दिक पांड्या फलंदाजीत योगदान देतोय, परंतु रोहित त्याच्याकडून जपूनच गोलंदाजी करून घेताना दिसला. रवींद्र जडेजाच्या दुखापतीमुळे संघात इन झालेल्या अक्षरने त्याची जागा पक्की केलीय. रिषभ पंतपेक्षा रोहित अनुभवी दिनेश कार्तिकवरच भरवसा दाखवताना दिसला.
आता भारतीय संघ २८ तारखेपासून दक्षिण आफ्रिकेचा सामना करणार आहे. अर्शदीप सिंग व दीपक हुडा यांचे पुनरागमन होत आहे. मोहम्मद शमीला कोरोना झाल्याने ऑस्ट्रेलियाविरुद्धची मालिकेतून माघार घ्यावी लागली होती आणि आफ्रिकेविरुद्ध तो तंदुरूस्त आहे की नाही, याचे अपडेट्स आलेले नाहीत. दीपक हुडाचीही पाठदुखी बळावल्याचे वृत्त समोर येतेय, त्यामुळे तो या मालिकेला मुकू शकतो. भुवी व हार्दिकला या मालिकेत विश्रांती दिली गेली आहे. दीपक चहरला संधी मिळण्याची अपेक्षा आहे.
भारतीय संघ - रोहित शर्मा ( कर्णधार), लोकेश राहुल, विराट कोहली, सूर्यकुमार यादव, दीपक हुडा, रिषभ पंत, दिनेश कार्तिक, आर अश्विन, युजवेंद्र चहल, अक्षर पटेल, अर्शदीप सिंग, मोहम्मद शमी, हर्षल पटेल, दीपक चहर, जसप्रीत बुमराह.
दक्षिण आफ्रिकेचा संघ - टेम्बा बवुमा ( कर्णधार), क्विंटन डी कॉक, बीजॉर्न फॉर्च्युन, रिझा हेंड्रिक्स, मार्को येनसेन, हेनरिच क्लासेन, केशव महाराज, एडन मार्कराम, डेव्हिड मिलर, लुंगी एनगिडी, एनरिच नॉर्खिया, वेन पार्नेल, अँडिले फेहलुकवायो, ड्वेन प्रेटोरियस, कागिसो रबाडा, रिली रोसोवू, तब्रेझ शम्सी, त्रिस्तान स्टब्स.
वेळापत्रक ( सर्व सामने सायंकाळी ७ वा. पासून)
- पहिला सामना - २८ सप्टेंबर, तिरुअनंतपूरम
- दुसरा सामना - २ ऑक्टोबर, गुवाहाटी
- तिसरा सामना - ४ ऑक्टोबर, इंदूर
- थेट प्रक्षेपण - स्टार स्पोर्ट्स व हॉटस्टार