भारतीय क्रिकेट संघाचा दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या मालिकेतील तिसरा आणि शेवटचा टी-२० सामना आज (१४ डिसेंबर) होणार आहे. मालिकेत बरोबरी साधण्यासाठी टीम इंडियाला हा सामना जिंकावा लागेल. यासाठी भारतीय गोलंदाजांना आपल्या कामगिरीत बरीच सुधारणा करावी लागणार आहे. हा सामना भारतीय वेळेनुसार रात्री ८.३० वाजता सुरू होईल. गाकबेरहा येथे संघाने दुसरा टी-२० सामना गमावला असून आता मालिका वाचवण्यासाठी संघाला चांगली कामगिरी करावी लागणार आहे.
पुढील वर्षी रंगणाऱ्या टी-२० विश्वचषक स्पर्धेच्या तयारीच्या दृष्टीने भारतासाठी प्रत्येक सामना महत्त्वाचा ठरणार आहे. मंगळवारी झालेल्या दुसऱ्या टी-२० सामन्यात भारतीय गोलंदाज झुंजताना दिसले. पाऊस आणि दव यांमुळे परिस्थिती अत्यंत आव्हानात्मक बनल्याने गोलंदाजांची कसोटी लागली. डावखुरा अर्शदीप सिंग आणि मुकेश कुमार या दोन्ही वेगवान गोलंदाजांनी अनुक्रमे १५.५० आणि ११.३३ धावा प्रतिषटके यानुसार धावांची खैरात केली. परिस्थिती आव्हानात्मक असली, तरी दोघे कल्पकतेने मारा करण्यात अपयशी ठरले. दीपक चहर वैयक्तिक कारणामुळे या दौऱ्यावर येऊ न शकल्याने जसप्रीत बुमराहच्या अनुपस्थितीत या दोन गोलंदाजांवरचभारतीय संघाची मदार आहे.
टी-२० संघात पुनरागमन केलेल्या रवींद्र जडेजालाही फारशी चमक दाखवता आली नाही. त्याचवेळी, युवा रिंकू सिंगने प्रभावित फटकेबाजी करताना पहिले आंतरराष्ट्रीय अर्धशतक झळकावले. गुरुवारीही तो हेच सातत्य कायम राखण्यावर भर देईल. कर्णधार सूर्यकुमार यादवनेही आणखी एक अर्धशतक झळकावत आपला फॉर्म दाखवून दिला. कर्णधार म्हणून ही मालिका बरोबरीत राखण्याच्या निर्धाराने तो पूर्ण प्रयत्न करील. फलंदाजांमध्ये यशस्वी जैस्वाल आणि शुभमन गिल यांच्याकडून मोठ्या अपेक्षा असतील. मंगळवारी दोघेही भोपळा न फोडताच बाद झाले होते.
प्रतिस्पर्धी संघ:
भारत : सूर्यकुमार यादव (कर्णधार), यशस्वी जैस्वाल, शुभमन गिल, रुतुराज गायकवाड, टिळक वर्मा, रिंकू सिंग, श्रेयस अय्यर, इशान किशन (यष्टीरक्षक), जितेश शर्मा (यष्टीरक्षक), रवींद्र जडेजा (उपकर्णधार), वॉशिंग्टन सन, रविंद्र जडेजा बिश्नोई., कुलदीप यादव, अर्शदीप सिंग, मोहम्मद सिराज, मुकेश कुमार, दीपक चहर.
दक्षिण आफ्रिका : एडन मार्कराम (कर्णधार), ओटनील बार्टमन, मॅथ्यू ब्रिट्झके, नॅंद्रे बर्जर, डोनोव्हन फरेरा, रीझा हेंड्रिक्स, हेनरिक क्लासेन, केशव महाराज, डेव्हिड मिलर, अँडिले फेहलुकवायो, तबरेझ शम्सी, ट्रिस्टन स्टब्स, लिझाद विल्यम्स.