भारतीय संघ सध्या दक्षिण आफ्रिका दौऱ्यावर आहे. तेथे ३ ट्वेंटी-२०, ३ वन डे व २ कसोटी सामन्यांची मालिका होणार आहे. वन डे आणि कसोटी मालिकेतून बरेच सीनियर खेळाडू संघात परतणार आहेत. त्यापैकी एक लोकेश राहुल आहे. KL Rahul कडे वन डे संघाच्या नेतृत्वाची जबाबदारी सोपवण्यात आली आहे. वन डे मालिकेसोबतच लोकेश राहुल कसोटी मालिकेसाठी निवडलेल्या संघाचाही सदस्य आहे. ही कसोटी मालिका लोकेश राहुलच्या कारकीर्दिसाठी महत्त्वाची ठरणार आहे आणि त्यामुळेच तो काही महत्त्वाचे निर्णय घेण्याच्या तयारीत असल्याचे वृत्त समोर येत आहे.
लोकेश राहुल २.० असे आपण याला म्हणू शकतो... लोकेश क्रिकेटच्या नव्या प्रवासाला सुरुवात करताना दिसेल. एक सलामीवीर म्हणून खेळणारा लोकेश आता मधल्या फळीचा प्रमुख फलंदाज म्हणून खेळताना दिसणार आहे. वन डे मालिकेत तो नेतृत्वच नव्हे तर यष्टिंमागेही दिसेल आणि कसोटीत यष्टिरक्षक-फलंदाज म्हणून तो खेळणार आहे. इशान किशनचे जरी १६ जणांमध्ये नाव असले, तरी लोकेशच यष्टींमागे दिसेल हे निश्चित आहे. आफ्रिकेविरुद्धच्या दोन कसोटीनंतर भारताला घरच्या मैदानावर इंग्लंडविरुद्धची पाच सामन्यांची कसोटी मालिका खेळायची आहे आणि त्यानंतर इंडियन प्रीमिअर लीग आहेच...
नवी दिल्ली येथे ऑस्ट्रेलियाविरुद्ध खेळलेल्या शेवटच्या कसोटीत ती सलामीला आला होता, परंतु आता त्याने मधल्या फळीतील फलंदाज होण्याचा गांभीर्याने विचार सुरू केला आहे. त्याने त्यासाठी मेहनतही घेतली आहे. आयपीएलमध्येही लखनौ सुपर जायंट्सच्या व्यवस्थापनाशी त्याने मधल्या फळीत खेळण्याबाबत चर्चा सुरू केली आहे. त्याने ४४ कसोटी, २३ वन डे व ५५ ट्वेंटी-२० सामन्यांत सलामी दिली आहे, परंतु आता तो मधल्या फळीत खेळण्यावर ठाम आहे. आशिया चषक आणि वन डे वर्ल्ड कप स्पर्धेत त्याने १० सामन्यांत ४५२ धावा केल्या आहेत.