नवी दिल्ली: भारताचा नवनियुक्त कसोटी उपकर्णधार केएल राहुल आगामी एकदिवसीय मालिकेत टीम इंडियाचे नेतृत्व करताना दिसू शकतो. कर्णधार रोहित शर्मा त्याच्या हॅमस्ट्रिंगच्या दुखापतीमुळे कसोटी मालिकेतून बाहेर आहे. जर रोहित एकदिवसीय मालिका सुरू होईपर्यंत बरा होऊ शकला नाही, तर संघाचे नेतृत्व केएल राहुलकडे येऊ शकते.
केएल राहुल उत्कृष्ट फॉर्ममध्येसध्या भारतीय क्रिकेट संघ तीन सामन्यांच्या कसोटी मालिकेत व्यस्त आहे, त्यातील पहिला सामना सेंच्युरियनमध्ये सुरू आहे आणि येथे केएल राहुलने सलामीवीर म्हणून धडाकेबाज शतक केले आहे. केएल राहुलची फलंदाजीमध्ये आलेली परिपक्वता पाहता संघ व्यवस्थापनाने रोहित शर्माच्या अनुपस्थितीत त्याची कसोटी उपकर्णधारपदी नियुक्ती केली. केएल राहुल एकदिवसीय क्रिकेटमध्ये उपकर्णधार देखील आहे आणि नियमित कर्णधाराच्या अनुपस्थितीत तो संघाचे नेतृत्व करताना दिसू शकतो.
रोहितवर NCAमध्ये उपचार सुरूरोहित शर्मा सध्या राष्ट्रीय क्रिकेट अकादमी (NCA), बंगळुरू येथे उपचार घेत आहे. बीसीसीआयच्या एका सूत्राने सोमवारी मीडियाला सांगितले की, रोहित शर्मा पूर्णपणे तंदुरुस्त नाही. अशा परिस्थितीत त्याला दक्षिण आफ्रिका दौऱ्यावर वनडे मालिकेसाठी पाठवण्याची शक्यता कमी आहे. जर तो वेळेवर सावरला नाही तर केएल राहुलकडे कर्णधारपदाची जबाबदारी दिली जाईल.
या खेळाडूंना मिळू शकते संधीएकदिवसीय मालिकेची घोषणा या आठवड्यात कधीही होऊ शकते. युवा सलामीवीर फलंदाज ऋतुराज गायकवाडही चांगल्या फॉर्ममध्ये असून नुकत्याच पार पडलेल्या विजय हजारे करंडक स्पर्धेत त्याने अप्रतिम कामगिरी केली आहे. याशिवाय गोलंदाज रविचंद्रन अश्विनलाही वनडे मालिकेत स्थान मिळण्याची शक्यता आहे. 30 किंवा 31 जानेवारीला निवड समितीची बैठक होणार असल्याचे सूत्रांकडून समजते. अश्विन, धवन, ऋतुराज आणि श्रेयस अय्यर यांच्याबाबत त्या बैठकीत निर्णय होईल.