पोर्ट एलिझाबेथ - विराट कोहलीच्या नेतृत्वाखाली दक्षिण आफ्रिकेच्या दौऱ्यावर गेलेल्या भारतीय संघाने नवा इतिहास रचला आहे. पाचव्या वनडेत दक्षिण आफ्रिकेवर भारतानं 73 धावांनी विजय मिळवत वनडे मालिकेवर 4-1 ने कब्जा मिळवला आहे. दक्षिण आफ्रिकेत वनडे क्रिकेटमधील भारताचा हा पहिला मालिका विजय ठरला आहे. भारताने दक्षिण आफ्रिकेला 201 धावांत गुंडाळून, पाचव्या वन डेत 73 धावांनी विजय साजरा केला. टीम इंडियाने या विजयासह पाच सामन्यांच्या मालिकेत 4-1 अशी विजयी आघाडी घेतली. या विजयासह भारतीय खेळाडूंनी अनेक दिग्गज खेळाडूंचा रेकॉर्ड मोडला आहे. फिरकी गोलंदाज कुलदीप यादवने श्रीलंकेचा महान गोलंदाज मुरलीधरनचा रेकॉर्ड तोडला आहे. यासोबतच दक्षिण आफ्रिकेत एकदिवसीय मालिकेत सर्वात जास्त विकेट घेण्याचा रेकॉर्ड कुलदीप यादवने आपल्या नावावर केला आहे.
सहा सामन्यांच्या मालिकेत आतापर्यंत पाच सामने खेळले गेले आहेत. या पाच सामन्यांमध्ये कुलदीप यादवने 16 विकेट्स घेतले आहेत. कुलदीप यादव दक्षिण आफ्रिकेत एकदिवसीय मालिकेत सर्वात जास्त विकेट घेणारा फिरकी गोलंदाज ठरला आहे. मुरलीधरनने 1998 मध्ये दक्षिण आफ्रिकेविरोधात 14 विकेट्स घेतल्या होत्या. मात्र ही तिरंगी मालिका होती, ज्यामध्ये पाकिस्तानदेखील खेळत होता. युजवेंद्र चहल दुस-या क्रमांकावर पोहोचला आहे. त्याने मालिकेत आतापर्यंत 14 विकेट्स घेतल्या आहेत.
कुलदीप यादव आणि युजवेंद्र चहलच्या आधी दक्षिण आफ्रिकेतील द्विपक्षीय एकदिवसीय मालिकेत एखाद्या स्पिनरकडून सर्वात जास्त 12 विकेट्स घेण्यात आल्या होत्या. कुलदीप आणि चहलच्या जोडीने या मालिकेत आतापर्यंत 30 विकेट्स घेतल्या आहेत. भारतीय फिरकी गोलंदाजांकडून द्विपक्षीय मालिकेत इतके विकेट्स घेण्याची ही पहिलीच वेळ आहे. याआधी 2006 मध्ये इंग्लंडसोबत झालेल्या सहा सामन्यांच्या मालिकेत भारतीय फिरकी गोलंदाजांनी 27 विकेट्स घेतले होते. ही मालिका भारतात पार पडली होती.
‘हिटमॅन’ रोहित शर्माने (115) झळकावलेल्या शतकाच्या जोरावर भारताने पाचव्या एकदिवसीय सामन्यात यजमान दक्षिण आफ्रिकेविरुद्ध निर्धारित 50 षटकांत 7 बाद 274 अशी समाधानकारक मजल मारली. रोहित शर्मा बाद झाल्यानंतर झटपट तीन बळी गेल्याने भारताला 300 धावांची अपेक्षित मजल मारता आली नाही. लुंगी एनगिडीने रोहित शर्मासह चार महत्त्वपूर्ण बळी घेत भारताला मोठी धावसंख्या उभारण्यापासून रोखले.
भारताने दक्षिण आफ्रिकेला विजयासाठी दिलेलं 275 धावांचं आव्हान पार करताना आफ्रिकन फलंदाजांची पुरती दमछाक उडाली आहे. अमलाने एकाकी झुंज देत दक्षिण आफ्रिकेच्या विजयासाठी प्रयत्नशील होता. पण तो 71 धावांत बाद झाला आणि भारताचं पारडं जड झालं. टीम इंडियाकडून कुलदीपने 57 धावांत चार फलंदाजांना घरचा रस्ता दाखवला. यजुवेंद्र चहल आणि हार्दिक पंड्याने प्रत्येकी दोन बळी मिळवले.