पर्थ : टी-२० विश्वचषकात रविवारी तीन सामने होणार आहेत. पहिला सामना सकाळी बांगलादेश आणि झिम्बाब्वे यांच्यात होईल. तर दुसऱ्या सामन्यात पाकिस्तान आणि नेदरलॅंड्स आमनेसामने असेल. सुपर संडेचा शेवटचा सामना भारत विरूद्ध दक्षिण आफ्रिका असा होणार आहे. खरं तर उद्या होणारा भारताचा सामना पाकिस्तानसाठी खूप महत्त्वाचा असणार आहे. भारतीय संघाने आपल्या सलामीच्या सामन्यात पाकिस्तानला धूळ चारून विजयी सलामी दिली होती. भारताने आतापर्यंत दोन सामने जिंकून ४ गुण मिळवले आहेत. तर पाकिस्तानने अद्याप विजयाचे खाते उघडले नाही. भारताने पहिल्या सामन्यात पाकिस्तानचा तर दुसऱ्या सामन्यात नेदरलॅंड्सचा पराभव केला. पाकिस्तानला भारत आणि झिम्बाब्वे यांच्याकडून पराभव स्वीकारावा लागला. त्यामुळे पाकिस्तानसाठी उद्याचा सामना 'करा किंवा मरा' असा असणार आहे.
याशिवाय उद्या पाकिस्तानी चाहते भारताच्या विजयासाठी देखील प्रार्थना करतील कारण भारताचा विजय पाकिस्तानला विश्वचषकात जिवंत ठेवू शकतो. पाकिस्तानचे पुढील सामने नेदरलॅंड्स, दक्षिण आफ्रिका आणि बांगलादेश यांच्याविरूद्ध होणार आहेत. जर त्यांनी हे तिन्ही सामने जिंकले तर त्यांचे एकूण ६ गुण होतील. त्यामुळे त्यांना उपांत्य फेरीत पोहोचण्यासाठी दक्षिण आफ्रिकेच्या पराभवासाठी प्रार्थना करावी लागेल. कारण आफ्रिकेचे सध्या ३ गुण आहेत. आफ्रिकेला उर्वरित सामन्यांत पाकिस्तानसह नेदरलँड्स, भारत व बांगलादेश यांच्याशी भिडावे लागेल. अशात भारत विरुद्ध दक्षिण आफ्रिका हा सामना पाकिस्तानसाठी निर्णायक ठरणार आहे.
शेजाऱ्यांचे नशीब भारताच्या हाती
भारतीय संघ सध्या शानदार फॉर्ममध्ये आहे, त्यामुळे रोहितसेना विजय मिळवून शेजाऱ्यांना खुश करेल अशी अपेक्षा आहे. मात्र जर दक्षिण आफ्रिकेने भारताला पराभूत केले तर पाकिस्तानचा विश्वचषकातून पत्ता कट होईल. पाकिस्तानने अद्याप विजयाचे खाते उघडले नाही. त्यांना गुरूवारी नवख्या झिम्बाब्वेच्या संघाने पराभवाची धूळ चारली होती.
झिम्बाब्वेविरूद्धचा पराभव पाकिस्तानला महागात पडणार
झिम्बाब्वेने प्रथम फलंदाजी करून पाकिस्तानला १३१ धावांचे आव्हानात्मक आव्हान दिले होते. झिम्बाब्वेच्या डावात पाकिस्तानकडून मोहम्मद वसीमने घेतलेल्या ४ विकेटमुळे झिम्बाब्बेच्या संघाच्या फलंदाजीची कंबर मोडली होती. मात्र १३१ धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना पाकिस्तानला देखील घाम फुटला. अखेर झिम्बाब्वेने अखेरच्या चेंडूवर शानदार विजय मिळवून इतिहास रचला. पाकिस्तानकडून मोहम्मद वसीमने सर्वाधिक 44 धावा केल्या होत्या. पाकिस्तानला देखील सुरूवातीपासून मोठे झटके बसले. मोहम्मद रिझवान (१४), कर्णधार बाबर आझम (४), शान मसूद (४४), इफ्तिखार अहमद (५), शादाब खान (१७) आणि हैदर अली (०) धावा करून बाद झाला. झिम्बाब्वेकडून सिकंदर रझाने सर्वाधिक ३ बळी पटकावले. तर ब्लेसिंग मुझरबानी, ब्रॅड इव्हान्स आणि ल्यूक जोंगवे यांना प्रत्येकी १-१ बळी घेण्यात यश आले.
पाकिस्तानचा अखेरच्या चेंडूवर पराभव
पाकिस्तानला अखेरच्या ९ चेंडूमध्ये १८ धावांची गरज होती. अशातच मोहम्मद नवाजने एक शानदार षटकार ठोकला. ८ चेंडूत १२ धावांची आवश्यकता असताना नवाजने एक धाव काढून मोहम्मद वसीमला स्ट्राईक दिले. अखेरच्या षटकात पाकिस्तानला विजयासाठी ११ धावांची आवश्यकता होती. झिम्बाब्वेकडून शेवटचे षटक ब्रॅड इव्हान्स घेऊन आला. पहिलाच चेंडू मोहम्मद नवाजने बाउंड्रीच्या दिशेने मारला मात्र झिम्बाब्वेच्या फिल्डरने केलेल्या शानदार फिल्डिंगमुळे चौकार वाचला या चेंडूवर पाकिस्तानने ३ धावा खेचल्या. दुसऱ्याच चेंडूवर मोहम्मद वसीमने चौकार ठोकून विजयाकडे कूच केली. तिसऱ्या चेंडूवर वसीमने एक धाव काढून मोहम्मद नवाजला स्टाईक दिले. आता ३ चेंडूत ३ धावांची गरज असताना तिसरा चेंडू डॉट गेला. २ चेंडूत ३ धावांची गरज होती, दुसऱ्या चेंडूवर नवाज बाद झाला आणि झिम्बाब्वेने सामन्यात पुनरागमन केले. अखेरच्या चेंडूवर पाकिस्तानला विजयासाठी ३ धावांची आवश्यकता होती, शाहिन आफ्रिदीने अखेरच्या चेंडूवर आफ्रिदीने एक धाव काढली आणि दुसरी धाव काढताना शाहिन आफ्रिदी धावबाद झाला. अखेर झिम्बाब्वेने विजयावर शिक्कामोर्तब केला आणि ऐतिहासिक कामगिरी केली. आक्रमक वाटणारा मोहम्मद नवाज अखेरच्या षटकात झेलबाद झाला.
रविवारी होणारे सामने -
- बांगलादेश विरूद्ध झिम्बाब्वे, सकाळी ८.३० वाजल्यापासून
- पाकिस्तान विरूद्ध नेदरलॅंड्स, दुपारी १२.३० वाजल्यापासून
- भारत विरूद्ध दक्षिण आफ्रिका, ४.३० वाजल्यापासून
सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"
Web Title: IND vs SA match is going to be crucial for Pakistan, as if South Africa wins, Pakistan will be out of the World Cup
Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.