India vs South Africa : भारतीय संघाचा जलदगती गोलंदाज मोहम्मद शमी ( Mohammed Shami ) दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या कसोटी मालिकेत खेळणार नसल्याची दाट शक्यता निर्माण झाली आहे. त्याने दोन कसोटी सामन्यांच्या मालिकेतून माघार घेतल्यास आश्चर्य वाटायला नको. भारतीय गोलंदाजाच्या घोट्याला दुखापत झाली होती आणि तो त्याच्यावर उपचार घेत होता. त्याचं नाव कसोटी संघात जरी असले तरी बीसीसीआयनेही त्याच्या तंदुरुस्तीवर पुढील प्रवास अवलंबून असेल, हे स्पष्ट केले होते. कसोटी मालिकेसाठी भारतीय संघ शुक्रवारी जोहान्सबर्गच्या दिशेने रवाना होणार आहे. कर्णधार रोहित शर्मासह अन्य खेळाडूंच्या पहिल्या बॅचसोबत शमी प्रवास करणार नसल्याचे वृत्त समोर येत आहे.
कर्णधारसह विराट कोहली, जसप्रीत बुमराह, आर अश्विन, नवदीप सैनी आणि हर्षित राणा हे शुक्रवारी दुबई मार्गे दक्षिण आफ्रिकेच्या दिशेने रवाना होतील. निवड समितीने अद्याप मोहम्मद शमीच्या जागी अन्य खेळाडूचे नाव जाहीर केलेले नाही, परंतु ट्वेंटी-२०, वन डे आणि भारत अ मालिकेच्या निमित्ताने अनेक खेळाडू आधीच आफ्रिकेत दाखल झालेले आहेत. त्यापैकी एकाला कसोटीत संधी मिळू शकते. सध्याच्या घडीला ७५ भारतीय खेळाडू आफ्रिकेत आहेत.
कसोटी मालिकेसाठी शमीची निवड सशर्त होती आणि ३० नोव्हेंबर रोजी दक्षिण आफ्रिका मालिकेसाठी संघांची निवड करताना BCCI ने शमीवर उपचार सुरू असल्याचे स्पष्ट केले होते. बीसीसीआयने शमीबाबत दिलेल्या निवेदनात म्हटले होते की, "मोहम्मद शमी सध्या वैद्यकीय उपचार घेत आहेत आणि त्याची उपलब्धता फिटनेसच्या अधीन आहे."
वेगवान गोलंदाज घोट्याच्या दुखण्याने त्रस्त होता आणि वेदना असूनही तो वर्ल्ड कप खेळला. विशेषत: डिलिव्हरी पॉईंटवर उजव्या पायावर उतरताना अस्वस्थता जाणवत होती. दोन कसोटींपैकी पहिला सामना बॉक्सिंग डे २६ डिसेंबर रोजी सेंच्युरियन येथे सुरू होईल. दुसरी कसोटी केपटाऊनमधील न्यूलँड्स येथे आहे, परंतु त्याआधी, २० डिसेंबरपासून कसोटी निवडीसाठी तीन दिवसीय सामना आहे.
भारताचा कसोटी संघ - रोहित शर्मा (कर्णधार), शुबमन गिल, यशस्वी जैस्वाल, विराट कोहली, श्रेयस अय्यर, ऋतुराज गायकवाड, इशान किशन, लोकेश राहुल, रविचंद्रन अश्विन, रवींद्र जडेजा, शार्दुल ठाकूर, मोहम्मद सिराज, मुकेश कुमार, मोहम्मद शमी, जसप्रीत बुमराह, प्रसिद्ध कृष्णा.