Women's World Cup 2022, IND vs SA: भारतीय महिला संघाचा महिला वर्ल्ड कपचा प्रवास आज संपुष्टात आला. प्रथम फलंदाजी करताना भारताने २७४ धावा केल्या होत्या. या आव्हानाचा पाठलाग करताना शेवटच्या षटकात २ चेंडूत ३ धावा हव्या असताना दीप्ती शर्माने नो बॉल टाकला, त्यावर झेल पकडला पण काहीही उपयोग झाला नाही. त्यानंतर पुढील दोन चेंडूंवर १-१ धावा सहज घेत दक्षिण आफ्रिकेने सामना जिंकला आणि भारताला स्पर्धेतून बाहेर काढलं.
भारतीय संघाने प्रथम फलंदाजी करताना ७ बाद २७४ धावा केल्या. स्मृती मानधना (७१) आणि शफाली वर्मा (७३) या दोघींनी दमदार ९१ धावांची सलामी दिली. या दोघी बाद झाल्यानंतर कर्णधार मिताली राजने अर्धशतक ठोकलं. तिने ६८ धावा केल्या. पाठोपाठ हरमनप्रीत कौरदेखील अर्धशतक करणारच होती, पण ४८ धावांवर ती बाद झाली. या चार फलंदाजांच्या फटकेबाजीमुळे भारताने मोठी धावसंख्या उभारली.
या आव्हानाचा पाठलाग करताना अनुभवी लॉरा वुल्वार्डने ८० धावांची दमदार खेळी केली. लारा गुडॉलचं अर्धशतक एका धावेनं हुकलं. कर्णधार सुने लूज २२ धावांवर स्वस्तात बाद झाली. पण त्यानंतर मिगनॉन ड्यू प्रीझ हिने शेवटपर्यंत मैदानात तळ ठोकून सामना जिंकवला. तिने नाबाद ५२ धावा केल्या. मारीझान काप हिने ३२ धावांची उपयुक्त खेळी केली. त्यानंतर तळाच्या फलंदाजांना सोबत घेत हाय व्होल्टेज ड्रामामध्ये ड्यू प्रीझने संघाचा विजय मिळवून दिला.
नो-बॉलने केला घात
--
--
शेवटच्या षटकात ७ धावांची आवश्यकता असताना दिप्ती शर्माने गोलंदाजीला सुरूवात केली. २ चेंडूत ३ धावांची आवश्यकता असताना ड्यू प्रीझने हवेत चेंडू मारला, हरमनप्रीतने झेलदेखील घेतला. पण दुर्दैवाने तो नो बॉल ठरवण्यात आला. त्यामुळे पुढील चेंडू फ्री हिट मिळाला. त्यानंतर पुढील २ चेंडूत २ धावा सहज काढत आफ्रिकेने सामना जिंकला. हा सामना हरल्याने भारतीय संघ स्पर्धेबाहेर गेला. हा सामना जिंकला असता तर भारताला सेमीफायनलमध्ये धडक मारण्याची संधी होती. पण तसं होऊ शकलं नाही.