Join us  

IND vs SA ODI : टीम इंडियाच्या कोचपदाची जबाबदारी द्रविड नाही तर दुसऱ्याच व्यक्तीवर, BCCI चा निर्णय

भारतीय संघ सध्या दक्षिण आफ्रिका दौऱ्यावर आहे.

By ऑनलाइन लोकमत | Published: December 16, 2023 12:07 PM

Open in App

नवी दिल्ली : भारतीय संघ सध्या दक्षिण आफ्रिका दौऱ्यावर आहे. ट्वेंटी-२० मालिकेने या दौऱ्याची सुरूवात झाली असून आता रविवारपासून सुरू होणाऱ्या वन डे मालिकेकडे लक्ष लागले आहे. मात्र, या मालिकेपूर्वी बीसीसीआयने मोठा निर्णय घेतला आहे. वन डे मालिकेपूर्वी टीम इंडियाच्या प्रशिक्षकपदी नव्या चेहऱ्याची वर्णी लागली आहे. खरं तर ट्वेंटी-२० मालिकेसाठी जो कोचिंग स्टाफ होता तो काढून टाकण्यात आला असून वन डे मालिकेसाठी नवीन कोचिंग स्टाफची निवड करण्यात आली आहे. एकूणच राहुल द्रविड वन डे मालिकेसाठी प्रशिक्षक नसणार आहेत. 

दरम्यान, राहुल द्रविड यांच्या प्रशिक्षकपदाचा कार्यकाळ नुकताच वाढवण्यात आला. त्यांचा कार्यकाळ वन डे विश्वचषकानंतर संपुष्टात आला. पण, बीसीसीआयने त्यांचा कार्यकाळ वाढवून संघरचनेत कोणतेही बदल होणार नसल्याचे संकेत दिले होते. दक्षिण आफ्रिकेविरूद्धच्या ट्वेंटी-२० मालिकेसाठी द्रविड यांना विश्रांती देण्यात आली होती. आता ते वन डे मालिकेसाठी देखील नसणार आहेत. कसोटी मालिकेतून द्रविड यांचे पुनरागमन होईल. 

रविवारपासून थरार 'क्रिकबझ'ने दिलेल्या वृत्तानुसार, राहुल द्रविड यांना कसोटी मालिकेवर पूर्णपणे लक्ष केंद्रित करायचे आहे आणि यावरून बीसीसीआयनेही त्यांना पाठिंबा दर्शवला आहे. त्यामुळेच वन डे मालिकेपासून दूर राहण्याचा निर्णय द्रविड यांनी घेतला. त्यांच्या जागी सितांशु कोटक हे प्रशिक्षकपदाची जबाबदारी सांभाळतील. तर, माजी यष्टिरक्षक अजय रात्रा संघाचे क्षेत्ररक्षण प्रशिक्षक असतील. राजीव दत्त गोलंदाजी प्रशिक्षकाची जबाबदारी सांभाळतील. पहिला वन डे सामना १७ डिसेंबर रोजी जोहान्सबर्ग येथे खेळवला जाणार आहे. १७, १९ आणि २१ या तीन दिवशी तीन वन डे सामने खेळवले जातील. तर, २६ डिसेंबरपासून दोन सामन्यांच्या कसोटी मालिकेचा थरार रंगणार आहे. 

दक्षिण आफ्रिकेविरूद्धच्या वन डे मालिकेसाठी भारतीय संघ -लोकेश राहुल (कर्णधार), युझवेंद्र चहल, रिंकू सिंग, संजू सॅमसन, ऋतुराज गायकवाड, साई सुदर्शन, तिलक वर्मा, रजित पाटीदार, श्रेयस अय्यर, अक्षर पटेल, वॉशिंग्टन सुंदर, कुलदीप यादव, मुकेश कुमार, आवेश खान, अर्शदीप सिंग आणि दीपक चहर. 

वन डे मालिकेचे वेळापत्रक - 

  1. १७ डिसेंबर - जोहान्सबर्ग, दुपारी १.३० वाजल्यापासून
  2. १९ डिसेंबर - जीकबेर्हा, सायंकाळी ४.३० वाजल्यापासून 
  3. २१ डिसेंबर - पर्ल, सायंकाळी ४.३० वाजल्यापासून 

 

टॅग्स :भारत विरुद्ध दक्षिण आफ्रिकाराहुल द्रविडबीसीसीआयभारतीय क्रिकेट संघ