IND vs SA ODI | नवी दिल्ली : भारतीय संघ आगामी काळात दक्षिण आफ्रिका दौऱ्यावर जाणार आहे. तिथे वन डे, ट्वेंटी-२० आणि कसोटी मालिका खेळवली जाणार आहे. १० डिसेंबरपासून सुरू होणाऱ्या या दौऱ्यासाठी भारतीय संघाची घोषणा झाली असून, तीन फॉरमॅटसाठी तीन वेगवेगळ्या कर्णधारांच्या नेतृत्वात भारतीय संघ मैदानात असणार आहे. भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने (BCCI) गुरूवारी आफ्रिका दौऱ्यासाठी टीम इंडियाची घोषणा केली. अनेक नव्या चेहऱ्यांना संधी मिळाली आहे, तर काही स्टार खेळाडूंचे देखील आंतरराष्ट्रीय संघात पुनरागमन झाले आहे.
स्टार फिरकीपटू युझवेंद्र चहलचे मोठ्या कालावधीनंतर भारतीय संघात पुनरागमन होत आहे. त्याला वन डे संघात संधी मिळाली आहे, तर ट्वेंटी-२० तून वगळण्यात आले. याचाच दाखला देत भारताचा माजी खेळाडू हरभजन सिंगनेबीसीसीआयवर सडकून टीका केली. ज्या फॉरमॅटमध्ये चहल अधिक चांगला खेळतो, प्रभावी ठरतो त्यातून त्याला मुद्दाम वगळले जात असल्याचा आरोप भज्जीने केला. तो त्याच्या युट्यूब चॅनेललवर बोलत होता.
भज्जीची बोचरी टीकाहरभजनने सांगितले की, आगामी दक्षिण आफ्रिका दौऱ्यासाठी भारतीय संघ जाहीर झाला. पण, युझवेंद्र चहलला ट्वेंटी-२० संघात संधी मिळाली नाही. त्याला वन डेमध्ये स्थान मिळाले आहे. ट्वेंटी-२० मधून का वगळले गेले? मला माहिती नाही. त्याला केवळ लॉलीपॉप दाखवला असून तो चोखायला सांगितला आहे. ज्या फॉरमॅटमध्ये तो अधिक प्रभावी ठरतो त्यातून त्याला काढले आणि इतर फॉरमॅटमध्ये संधी दिली गेली.
भारताचा वन डे संघ -लोकेश राहुल (कर्णधार), युझवेंद्र चहल, रिंकू सिंग, संजू सॅमसन, ऋतुराज गायकवाड, साई सुदर्शन, तिलक वर्मा, रजित पाटीदार, श्रेयस अय्यर, अक्षर पटेल, वॉशिंग्टन सुंदर, कुलदीप यादव, मुकेश कुमार, आवेश खान, अर्शदीप सिंग आणि दीपक चहर.
वन डे मालिकेचे वेळापत्रक
- १७ डिसेंबर - जोहान्सबर्ग, दुपारी १.३० वाजल्यापासून
- १९ डिसेंबर - जीकबेर्हा, सायंकाळी ४.३० वाजल्यापासून
- २१ डिसेंबर - पर्ल, सायंकाळी ४.३० वाजल्यापासून