मुंबई - दक्षिण आफ्रिकेत पहिल्यांदा आढळलेल्या कोरोना विषाणूच्या ओमायक्रॉन व्हेरिएंटमुळे संपूर्ण जगात भीतीचे वातावरण पसरले आहे. त्यामुळे विविध निर्बंध लागू करण्यात येत आहेत. दरम्यान, ओमायक्रॉन व्हेरिएंटचा फटका भारतीय क्रिकेट संघाच्या दक्षिण आफ्रिका दौऱ्यालाही बसण्याची शक्यता आहे. तसेच हा दौरा आठवडाभरासाठी पुढे ढकलण्यात येण्याची शक्यता आहे. बीसीसीआयने दक्षिण आफ्रिका दौऱ्यासाठीची संघनिवड पुढे ढकलली आहे. तसेच बीसीसीआयकडून दक्षिण आफ्रिका दौऱ्यासाठी केंद्र सरकारकडून परवानगीची प्रतीक्षा केली जात आहे.
सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार दक्षिण आफ्रिका दौऱ्यासाठी केंद्र सरकारने बीसीआयला अद्याप परवानगी दिलेली नाही. तसेच पुढील धोका विचारात घेऊन हा दौरा एका आठवड्यासाठी पुढे ढकलण्यात आला आहे. माध्यमांतील वृत्तांनुसार दक्षिण आफ्रिका दौऱ्यासाठी भारतीय संघाची निवड ही कानपूर कसोटीनंतर करण्यात येणार होती. ज्या खेळाडूंना न्यूझीलंडविरुद्धच्या मालिकेसाठी विश्रांती दिली गेली होती. त्यांना दक्षिण आफ्रिका दौऱ्यासाठी जाण्यापूर्वी आठ दिवसांच्या क्वारेंटाईनमध्ये ठेवण्यात येणार होते. मात्र शेतकऱ्यांसोबत कुठलाही संवाद साधला गेलेला नाही.
अन्य वृत्तानुसार बीसीसीआय आणि क्रिकेट दक्षिण आफ्रिका या दौऱ्याचे वेळापत्रक पुन्हा एकदा तयार करू शकते. अशा परिस्थितीत तीन कसोटी सामन्यांची मालिका दोन कसोटी सामन्यांची खेळवण्याचा बीसीसीआयचा प्रयत्न आहे. त्यामुळे भारतीय संघाला दक्षिण आफ्रिकेसाठी रवाना होण्यापूर्वी काही वेळ मिळू शकेल.