पर्थ : टी-20 विश्वचषकात रविवारी भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यात सामना पार पडला. या सामन्यात दक्षिण आफ्रिकेने 5 गडी राखून विजय मिळवला आणि गुणतालिकेत पहिले स्थान पटकावले. या सामन्यात भारतीय संघाने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला होता. प्रथम फलंदाजी करताना रोहित सेनेची सुरवात निराशाजनक झाली. भारताकडून सूर्यकुमार यादव व्यतिरिक्त कोणत्याच फलंदाजाला मोठी खेळी करता आली नाही. दुसऱ्या डावात आफ्रिकेच्या फलंदाजांनी रवीचंद्रन अश्विनविरूद्ध आक्रमक फलंदाजी केली. आफ्रिकेने अनुभवी अश्विनला 4 षटकांत 43 धावा चोपल्या. भारतीय संघाने 20 षटकांत 9 बाद 133 धावा केल्या होत्या.
दरम्यान, सामन्यादरम्यान अश्विनसोबत एक अशी घटना घडली जिने सर्वांचेच लक्ष वेधले. अश्विनने आफ्रिकेचा फलंदाज डेव्हिड मिलरला मंकडिंग करून बाद करण्याची संधी सोडली या घटनेचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत असून चाहते त्यावर प्रतिक्रिया देत आहेत. ही घटना अश्विनच्या चौथ्या षटकांत घडली. मिलर त्याच्या वैयक्तिक 46 धावांवर खेळत होता. या षटकाचा अखेरचा चेंडू टाकताना अश्विन अचानक थांबला आणि नॉन-स्ट्रायकरवर असलेला मिलर क्रीज सोडताना दिसला. अश्विनला इथे मिलरला मंकडिंग करून बाद करण्याची संधी होती. पण त्याने तसे केले नाही याचाच दाखला देत चाहत्यांनी मीम्स व्हायरल केले आहेत.
भारताच्या पराभवाने पाकिस्तान स्पर्धेतून बाहेरआता या घटनेचा व्हिडीओ सोशल मीडियावर खूप व्हायरल होत आहे. तर चाहते देखील यावर भन्नाट प्रतिक्रिया देत आहेत. एका चाहत्याने लिहले की, "सामना हरायचा होता म्हणून सोडून दिलं, जिंकायचं असतं तर कधीच बाद केलं असतं." ट्विटरवर चाहते असे भन्नाट मीम्स व्हायरल करत आहेत. कालच्या सामन्याबद्दल भाष्य करायचे झाले तर दक्षिण आफ्रिकेने 5 गडी राखून विजय मिळवला. भारताने दिलेल्या 133 धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना आफ्रिकेची देखील सुरूवात निराशाजनक झाली होती. मात्र डेव्हिड मिलरने केलेल्या अर्धशतकी खेळीच्या जोरावर आफ्रिकेने दणदणीत विजय मिळवला. भारताच्या या पराभवासोबतच पाकिस्तानचे विश्वचषकातील आव्हान संपुष्टात आले आहे. आफ्रिकेकडून डेव्हिड मिलर आणि एडन मार्करम यांनी अर्धशतकी खेळी केली. भारताकडून अर्शदीप सिंगने सर्वाधिक 2 बळी पटकावले, तर मोहम्मद शमी, आर अश्विन आणि हार्दिक पांड्या यांना प्रत्येकी 1-1 बळी घेण्यात यश आले.
सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"