भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यात 9 जूनपासून 5 टी20 सामन्यांच्या मालिकेला सुरुवात होत आहे. या मालिकेसाठी प्रामुख्याने आयपीएल 2022 मध्ये चांगली कामगिरी केलेल्या खेळाडूंना संधी देण्यात आली आहे. यातही तीन खेळाडू असे आहेत, ज्यांच्या कामगिरीवर सर्वांचेच लक्ष राहणार आहे.
दिनेश कार्तिक -दिनेश कार्तिकने आयपीएल सीझन 2022 मध्ये 'सुपर स्ट्रायकर ऑफ द सीझन' हा पुरस्कार जिंकला आहे. त्याने डेथ ओव्हर्समध्ये 220 च्या स्ट्राइक रेटने 242 धावा फटकावल्या आहेत. आता तो, आफ्रिका दौऱ्यातही आयपीएल 2022 च्या कामगिरीची पुनरावृत्ती करून, वर्षाच्या अखेरीस ऑस्ट्रेलियामध्ये होणाऱ्या T20 वर्ल्ड कपसाठीच्या भारतीय संघात स्थान मिळविण्याचा प्रयत्न करेल. त्याने आपल्या अप्रतिम फलंदाजीने 2022 मध्ये आरसीबीला अनेक सामन्यांमध्ये विजय मिळवून दिला आहे.
उमरान मलिक -सनरायझर्स हैदराबादचा वेगवान गोलंदाज उमरान मलिक हा मुळचा जम्मूतील आहे. त्याने आयपीएल 2022 च्या जवळपास प्रत्येक सामन्यात 150 किमी प्रति तास वेगाने गोलंदाजी करत सर्वाचेच लक्ष वेधले होते. त्याने आपल्या दुसऱ्याच आयपीएल सिजनमध्ये, चॅम्पियन ठरलेल्या गुजरात टायटन्सविरुद्ध चार षटकांत 25 धावा देत पाच बळी मिळवले होते. आता दक्षिण आफ्रिके विरुद्ध त्याच्यावर सर्वांचे लक्ष राहील.
अर्शदीप सिंग -अर्शदीप सिंग हाही मलिक प्रमाणेच वेगवान गोलंदाज आहे, अर्शदीपनेही आयपीएल 2022 मध्ये भेदक गोलंदाजी करत सर्वांचेच लक्ष वेधले होते. या 23 वर्षीय गोलंदाजाने पंजाब किंग्ससाठी डेथ ओव्हर्समध्ये यॉर्करचा मारा करत जबरदस्त गोलंदाजी केली होती. 3/37 ही अर्शदीपची सर्वश्रेष्ठ कामगिरी असून त्याने 10 विकेट्सघेतल्या आहेत. अर्शदीप हा 2018 मधील अंडर 19 वर्ल्ड कप विजेत्या संघाचा सदस्यही होता. दक्षिण आफ्रिकेविरुद्ध याच्यावरही सर्वांचे लक्ष असणार आहे.