भारतीय संघ मोठ्या कालावधीपर्यंत दक्षिण आफ्रिका दौऱ्यावर होता. तिथे ट्वेंटी-२०, वन डे आणि कसोटी मालिका खेळवली गेली. ट्वेंटी-२० मालिका १-१ अशा बरोबरीत संपली. एक सामना पावसाच्या कारणास्तव रद्द करण्यात आला. तर, लोकेश राहुलच्या नेतृत्वात टीम इंडियाने वन डे मालिकेत २-१ असा विजय साकारला. खरं तर भारताला आफ्रिकेच्या धरतीवर एकाही मालिकेत पराभव स्वीकारावा लागला नाही. कसोटी मालिकेतील पहिला सामना गमावल्यानंतर दुसरी कसोटी जिंकून टीम इंडियाने मालिका बरोबरीत संपवली.
दरम्यान, भारताला मागील ३२ वर्षात एकदाही आफ्रिकेच्या धरतीवर कसोटी मालिका जिंकता आली नाही. पण, केपटाउनमध्ये ऐतिहासिक विजय मिळवण्यात रोहितसेनेला यश आले. भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यातील दुसरा कसोटी सामना अवघ्या दीड दिवसात संपला. पण, सलामीच्या सामन्यात पाहुण्या भारताला दारूण पराभवाचा सामना करावा लागला होता. मालिकेतील पहिला सामना यजमान आफ्रिकेने एक डाव आणि ३२ धावांनी जिंकला होता. भारताच्या लाजिरवाण्या पराभवानंतर संघावर सर्वच स्तरातून टीका झाली. याचाच दाखला देत भारताचा माजी कर्णधार सौरव गांगुलीने आपल्या संघाची पाठराखण केली.
गांगुलीकडून संघाची पाठराखण
दक्षिण आफ्रिका दौऱ्यावर भारतीय संघाच्या कामगिरीबाबत अनेक प्रश्न उपस्थित केले जात आहेत. अशातच आता भारतीय संघाचा माजी कर्णधार सौरव गांगुलीने यावर आपली प्रतिक्रिया व्यक्त केली. गांगुली म्हणाला की, भारत एक खूप चांगला संघ आहे. जर टीम इंडियाने एखादा सामना हरला की लोक असे बोलतात जसे काय आपला संघच वाईट आहे. पण, तसे काहीही नाही. भारताने वन डे मालिका जिंकली, ट्वेंटी-२० मालिकेत युवा खेळाडूंनी अप्रतिम कामगिरी केली. तसेच कसोटी मालिकेतही चांगली कामगिरी केली, हे खूप चांगले लक्षण आहे. गांगुली माध्यमाशी बोलत होता.
दरम्यान, वन डे विश्वचषकातील पराभवानंतर प्रथमच रोहित शर्मा आणि विराट कोहली मैदानात दिसले. पण, पहिल्या कसोटीत भारतीय फलंदाजांना अपयश आले. मात्र, दुसऱ्या सामन्यात मोहम्मद सिराज आणि जसप्रीत बुमराह या जोडीने यजमानांना घाम फोडला अन् भारताने मोठा विजय मिळवला.
Web Title: ind vs sa series Former Indian cricket team captain and former BCCI president Sourav Ganguly has said that Team India is a good team
Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.